जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, ‘टेस्ला’, ‘स्पेसएक्स’ आणि ‘एक्स’ या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांनी ‘ईव्हीएम हॅक होऊ शकतं’ असा दावा केल्यानंतर त्याचे भारतात पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून यावर भाष्य केलं आहे. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता. यावरून ठाकरे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. त्यावर निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी स्पष्टीकरण दिलं. सुर्यवंशींच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, तंत्रज्ञानाच्या जगातील दिग्गज व्यक्ती एलॉन मस्क म्हणत असेल की, “ईव्हीएम हॅक होऊ शकतं आणि निवडणूक अधिकारी वंदना सुर्यवंशी वेगळे दावे करत असतील तर एलॉन मस्कला वंदना सुर्यवंशींकडे शिकवणी लावावी लागेल.”
संजय राऊत म्हणाले, उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील निकाल हा देशभरातील सर्व निकाल प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यांपैकी एक आदर्श घोटाळा आहे. भाजपा आणि त्यांच्याबरोबरच्या टोळ्यांनी देशभरातील काही मतदारसंघांमध्ये चुकीच्या मार्गाने विजय मिळवला आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ. या लोकांनी शासकीय आणि निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन घोटाळे केले आहेत.
ठाकरे गटातील खासदार म्हणाले, निवडणूक अधिकाऱ्यांनी अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केलं होतं. त्यानंतर दोनदा फेर मतमोजणी करून त्यांच्याविरोधात निकाल दिला. निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचा या घोटाळ्यात मोठा हात आहे. आता त्या स्पष्टीकरण देत सुटल्या आहेत, तांत्रिक बाबी सांगू लागल्या आहेत. मुळात तो त्यांचा प्रांत नाही. तंत्रज्ञानाच्या जगातील दिग्गज एलॉन मस्कने सूर्यवंशींकडे शिकवणी लावावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाच्या जगातील सर्वात मोठा माणूस सांगतोय की इव्हीएम हॅक होऊ शकतं आणि हे लोक (भाजपा) वेगळे दावे करतात.
राऊत म्हणाले, मला आता असं वाटतं की उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी सूर्यवंशी यांचा पूर्व इतिहास तपासायला हवा. निवडणूक मतमोजणी जिथे झाली तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपासायला हवं. निवडणूक अधिकाऱ्यांना त्या काळात कोणाचे फोन आले ते तपासायला व त्यांचा फोन ताब्यात घ्यायला हवा. रवींद्र वायकर यांचे नातेवाईक तिथे फिरत होते. अधिकाऱ्यांचे फोन घेऊन त्यांचे काही उद्योग चालू होते. त्यामुळे वनराई पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ते फोन जप्त केले. त्यानंतर आता वायकरांचा जवळचा माणूस, एक निवृत्त पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्याने गेल्या चार दिवसांपासून वनराई पोलीस ठाण्याच्या येरझारे मारत आहेत. ते कशासाठी करतोय? कारण त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले फोन बदलायचे आहेत. त्याला कुठलं तरी डील करायचं आहे. ते डील झालं की नाही हे तपासायला हवं. सीसीटीव्ही फुटेज हटवण्यासाठी अथवा बदलण्यासाठी डील झालं आहे, हे तुम्ही सांगा, नाहीतर मी सांगतो.
हे ही वाचा >> “…म्हणून देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले”, आव्हाडांकडून राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला श्रेय
खासदार राऊत म्हणाले, उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकाल हा रहस्यमय आणि संशयास्पद आहे त्यामुळे मला असं वाटतं की रवींद्र वायकर यांचा लोकसभेचे सदस्य म्हणून शपथविधी होऊ नये. या प्रकरणाची शहानिशा होत नाही, लोकांच्या मनातला संशय दूर होत नाही, तोवर त्यांना शपथ घेण्यापासून थांबवणे हीच खरी लोकशाही आहे. निवडणूक आयोगाने त्यांना शपथ घेण्यापासून रोखावं कारण त्यांनी चोरून विजय मिळवला आहे. अशा प्रकारे देशभरात ४५ निकाल लावले आहेत
© IE Online Media Services (P) Ltd