राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी भाजपाच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, “ज्या लोकांमध्ये अहंकार भरला होता, त्यांना प्रभू श्रीरामाने २४० जागांवर मर्यादित ठेवलं”. पाठोपाठ संघातील इतर वरिष्ठ नेत्यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. दरम्यान, संघातील नेत्यांच्या वक्तव्यांचा दाखला देत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले की संघाला नरेंद्र मोदींचं अहंकारी सरकार पाडायचं आहे. भाजपाची मातृसंस्था जर या सरकारला सुरुंग लावत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत असं म्हणावं लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेतील भाजपाच्या कामगिरीवर ‘देवाचा न्याय असाच असतो’ अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संजय राऊत यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, “देवाचा न्याय काय असतो ते जनतेने दाखवून दिलं आहे. आम्ही जनतेला जनार्दन म्हणतो, लोक हेच लोकशाहीतले देव आहेत आणि काही लोकांनी देवासमोर चोरी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३० हून अधिक जागांवर भाजपा हरली आहे. परंतु, त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर जबरदस्ती करून, त्यांना घाबरवून, धमक्या देऊन त्या ३० जागांवर विजय मिळवला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात जाईल. खरंतर नरेंद्र मोदी, अमित शाह हे हरले आहेत. वाराणसीत मोदी हरले आहेत.”

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी, “आम्हाला (भाजपा) आता संघाची (आरएसएस) गरज नाही, भाजपा ही सामर्थ्यवान पार्टी आहे”, असं वक्तव्य केलं होतं. तसेच अलीकडच्या काळात भाजपा नेत्यांनी संघाच्या भूमिकांकडे दुर्लक्ष केलं होतं. यामुळे संघ भाजपामुळे दुखावला गेला असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “त्यांचं काय दुखावलंय, यात मला पडायचं नाही. मात्र, संघाला या देशाच्या लोकशाहीची, राजकीय सभ्यतेची, संस्कारांची चिंता असेल तर त्यांनी पडद्यामागे राहून केवळ प्रवचनं न जोडता देशाला दिशा द्यावी. मला खात्री आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवलं तर ते नरेंद्र मोदी यांचं अहंकारी सरकार हटवू शकतात. मोदींचं अहंकारी सरकार १५ मिनिटेही टिकू शकणार नाही.”

हे ही वाचा >> “मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

संजय राऊत म्हणाले, “संघाच्या भूमिका पाहता त्यांना मोदींचं सरकार पाडायचंय असं वाटतं. त्यांना अहंकाराचा पराभव करायचा आहे असं दिसतंय. भाजपाच्या या अहंकारी सरकारला सुरूंग लावण्याचं कामं त्यांची ही मातृसंस्था (RSS) करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत, असं आम्ही म्हणू.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut claims rss wants to topple narendra modi arrogant government asc