“आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो, मात्र शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्ये आपसात चर्चा झाली नव्हती”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, “महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचाच विचार चालू होता, मात्र अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध केला होता.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी असं मत मांडलं होतं की महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व अशा नेत्याने करावं, जे नेतृत्व महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला मान्य होईल. यावर या दोन्ही प्रमुख नेत्यांचं एकमत झालं होतं. तर दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता. एकनाथ शिंदे आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असं तटकरे, पवार आणि वळसे पाटील यांनी सांगितलं होतं. हे नेते म्हणाले होते, आम्ही वरिष्ठ आहोत आम्ही एका कनिष्ठाच्या हाताखाली काम करणार नाही.”

ठाकरे गटाचे खासदार म्हणाले, “२०१९ साली जेव्हा मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपात वाद चालू होता तेव्हा शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती. महाविकास आघाडीची स्थापना होण्याआधीच्या गोष्टी मी तुम्हाला (प्रसारमाध्यमं) सांगतोय… एकनाथ शिंदे हे आमचे विधिमंडळ नेते असल्यामुळे तेव्हा मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं. परंतु, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला एक निरोप पाठवला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याबाबत दिल्लीचा निर्णय काय होईल हे आम्हाला माहिती नाही. परंतु, आम्हाला मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे चालणार नाहीत. देवेंद्र फडणवीसांसह आज भाजपाचे महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ते आहेत, त्या सर्वांची हीच भूमिका होती. तेव्हा एकनाथ शिंदे कोणालाच नको होते.”

“शिंदेंच्या नावाला भाजपाचाही विरोध होता”

राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं म्हणणं होतं की एकनाथ शिंदेंचा वकूब नाही, त्यांचा अनुभव कमी आहे. तसेच पैसा फेको तमाशा देखो अशी त्यांची कामाची पद्धत असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपासही नको होते. राज्याचं नेतृत्व त्यांनी करू नये अशी भाजपा नेत्यांची भूमिका होती. कारण त्यांना कोणताही अनुभव नाही, ते फक्त पैशांचे व्यवहार करणे, व्यापार करणे अशी कामं करू शकतात. तसेच व्यापार करणं म्हणजे नेतृत्व करणं, असं होत नाही, ही भाजपाची भूमिका होती.”

हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीसांना ‘फडतूणवीस’ म्हणत उद्धव ठाकरेंचा पोलिसांना इशारा, म्हणाले…”मला..”

संजय राऊत म्हणाले, “२०१९ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याआधीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. भारतीय जनता पार्टीचं ठरलं होतं की दिल्लीतून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय काय होईल तो होईल, तो आम्ही मान्य करू, शिवसेनेला मुख्यमंत्री द्यायचं की नाही हा पुढचा विषय असेल. परंतु, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यायचं ठरलं तर आम्हाला शिंदे चालणार नाहीत. दुसऱ्या बाजूला आम्ही एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी नेमणूक केली होती. त्यामुळे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय झाला असता तर कदाचित एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut claims shivsena wanted eknath shinde cm bjp fadnavis ncp ajit pawar sunil tatkare opposed asc
Show comments