शेतमालाला किमान हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच अन्य राज्यांतील शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. मात्र या शेतकरी आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या याच भूमिकेवर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोदी सरकार तसेच भाजपावर हल्लाबोल केलाय. ते आज मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
“ब्रिटिशांनीही अशी दमनशाही केली नाही”
किमान हमीभावासाठी देशातील शेतकरी राजधानीच्या दिशेने कूच करत आहेत. त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर तोफा, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पाण्याचा मारा केला जातोय. रस्त्यावर खिळे ठोकलेले आहेत. गोळीबार करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. शेतकऱ्यांची वाहनं अवडली जात आहेत. काही ठिकाणी पक्क्या भिंती उभ्या केल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान ब्रिटिशांनीही अशा पद्धतीची दमनशाही करण्यात आली नव्हती. तशा प्रकारची दमनशाही मोदी सरकार शेतकऱ्यांविरोधात करत आहे. ब्रिटिशांच्या काळातही शेतकरी आंदोलन करायचे. त्यांचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केले होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“राजधानी मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या नावावर केली आहे का?”
“आतादेखील मोदी सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मन:स्थितीत आहे. शेतकरी देशाच्या राजधानीत आपले प्रश्न घेऊन घेऊन येऊ शकत नाही का? देशाची राजधानी मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या नावावर केली आहे का? शेतकऱ्यांना रोखले जात असेल तर ही एका प्रकारची सरकारची हुकूमशाही, एकाधिकारशाही, गुंडगिरी, झुंडशाही चालू आहे,” अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली.
“पीकविम्याचा बोजवारा उडाला”
“स्वामिनथन यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. स्वामिनाथ यांनी शेतमालासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. त्यात शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी शिफारस केली होती. हे मोदी सरकार २०१४ पासून सांगत आहे की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. शेतकऱ्यांना एकपटही उत्पन्न मिळत नाहीये. पीकविम्याचा बोजवारा उडाला आहे. कोणीही बांधावर जायला तयार नाही. सगळे राजकारणात अडकले आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांना रोखले जात आहे,” असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
“उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करणार”
“काल उद्धव ठाकरे उत्तर महाराष्ट्रात होते. संभाजीनगरात होते. त्यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्रत्येक सभेत मांडलेला आहे. लवकरच उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने अन्याय केला जातोय, त्याचा आम्ही निषेध करतो,” असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.