शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी सरकारविरोधात बोलण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असल्याचं म्हटलं. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारवर झालेल्या टीकेचंही उदाहरण दिलं. त्यांच्यावर सरकारविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर ते मंगळवारी (१६ मे) न्यायालयासमोर हजर राहिले. यानंतर न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “सरकारविरोधात बोलणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. या देशात सरकारने घटनेनुसार काम करावं लागतं. देशात घटनेनुसार कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं असं आपण म्हणतो. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं आहे की नाही याचा निर्णय व्हायचा आहे. तो निर्णय झाल्यावर ते घटनात्मक राज्य होईल.”
“राज्य सरकार घटनाबाह्य आहे ही लोकांची भावना”
“अशावेळी हे राज्य सरकार घटनाबाह्य आहे ही लोकांची भावना आहे. ती भावना मी सांगितली. अशा घटनाबाह्य सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही यावर मी प्रश्न विचारला. सरकारने गुन्हे दाखल केले ते ठीक आहे. त्यांना गुन्हे दाखल करू द्या. न्यायालयाने मला अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“सर्वोच्च न्यायालयालाही हे घटनाबाह्य सरकार वाटतं”
संजय राऊत पुढे म्हणाले, “असं असलं तरी महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेच्या मनात राज्यातील सरकारविषयी प्रश्न कायम आहे. राज्यातील सरकार घटनात्मक पद्धतीने आलं आहे की नाही यावर लोकांना शंका आहे. लोकांना हे घटनाबाह्य सरकार असल्याचं वाटतं. सर्वोच्च न्यायालयाचंही तेच म्हणणं आहे.”
हेही वाचा : नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले…
“पोलिसांनी स्वतःहून माझ्यावर गुन्हा दाखल केला, कारण…”
“पोलिसांनी स्वतःहून माझ्यावर गुन्हा दाखल केला. कारण शिंदे-फडणवीस सरकारची ती इच्छा आहे. मी सरकार घटनाबाह्य पद्धतीनेच काम करतंय असं जे म्हणतो ते पुन्हा एकदा सिद्ध झालं,” असं राऊत यांनी म्हटलं.
“उद्धव ठाकरेंच्या सरकारवरही टीका, पण आम्ही कुणाला तुरुंगात टाकलं नाही”
“या देशात, जगात सरकारवर कुणी टीका करत नाही का. महाराष्ट्रात यापूर्वी सरकारवर टीका झाली नाही का. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका झाली नाही का. उद्धव ठाकरेंवरही टीका झाली. त्यांच्या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेवरही टीका झाली. तेव्हा आम्ही कुणाला तुरुंगात टाकलं का. आम्ही कुणालाही तुरुंगात टाकलं नाही,” असंही राऊतांनी नमूद केलं.