शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावरून सुरू असलेल्या राजकारणावरून जोरदार हल्लाबोल केलाय. “ज्यांनी संभाजीराजे छत्रपतींना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी उडी फसली आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शाहू महाराजांमधील कौटुंबिक संबंधांचाही उल्लेख केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शाहू महाराज केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी आदरणीय आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि सध्याच्या शाहू महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध होते आणि आजही आहेत. काल त्यांनी जी भूमिका घेतली त्यानंतर मी इतकंच म्हणालो की कोल्हापूरच्या मातीत आजही प्रामाणिकपणा सत्य जीवंत आहे. शाहू घराण्याने आपली सत्यवादी परंपरा जीवंत ठेवली.”
“संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली”
“मी कोल्हापूरमध्ये आहे आणि नक्कीच शाहू महाराजांना भेटून त्यांना अभिवादन करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला जसा छत्रपती शाहू महाराजांबद्दल आदर आहे, तसाच संभाजीराजेंविषयी प्रेम आहे. आम्हाला वादातून राजकारण करायचं नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची उडी फसलेली आहे. त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र, शाहू महाराजांनी भूमिका घेतली त्याने त्यांची उडी फसली,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
“शिवसेनेचं मन साफ आहे, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही”
“शिवसेनेचं मन साफ आहे, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही. शिवसेनेने आधीही भूमिका स्पष्ट केली होती की शिवसेनेच्या दोन जागा आहेत. राज्यसभेत जायचं असेल तर तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घ्यावी. आम्ही तुम्हाला आमची मतं देऊ,” असंही राऊतांनी नमूद केलं.
“छत्रपतींना समर्थक नसतात, संपूर्ण प्रजाच छत्रपतींची असते”
संभाजीराजे छत्रपतींच्या समर्थकांनी संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “छत्रपतींना समर्थक नसतात, संपूर्ण प्रजाच छत्रपतींची असते.”
“मी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कान टोचले नाही”
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या फुटीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कान टोचले नाही. समिती ज्या पद्धतीने फुटतीय, विस्कळीत होतेय त्यामुळे त्या भागातील मराठी माणसाची एकजुट अडचणीत आहे आणि त्याचा फटका फक्त बेळगावला नाही, तर सातारा, सांगली, कोल्हापूर या भागालाही बसतोय. तेथेही अडचणी निर्माण होत आहेत.”
“यापुढे आम्ही तिकडे येऊ ते शिवसेना म्हणून येऊ”
“यापुढे आम्ही तिकडे येऊ ते शिवसेना म्हणून येऊ. आमचा प्रयत्न बेळगाव आणि सीमाभागातील निवडणुका शिवसेना म्हणून लढण्याचा राहील,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.