लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपाने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मात्र जागावाटपावर अद्याप तोडगा गाढता आलेला नाही. महाविकास आघाडीच्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपावर चर्चा चालूच आहे. दरम्यान, एकीकडे ही चर्चा चालू असताना प्रकाश आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मविआसोबत आपली पूर्णपणे युती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मविआने बोलावलेल्या बैठकींना जाऊ नये, असा आदेश प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय. यावरच ठाकरे गटाचे नेत तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
“प्रकाश आंबेडकरांनी हुकूमशाहीचा…”
संजय राऊत प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले की, आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना इकडे जाऊ नका आणि तिकडे जाऊ नका असे सांगावे लागत नाही. आंबेडकरी जनतेची एक भूमिका आहे. या वेळी प्रकाश आंबेडकरांनी हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत जायला हवं, अशी भावना राज्यभरातील लोकांची आहे.
“परिवर्तन घडून न आल्यास देशात…”
“बाळासाहेब आंबेडकर हे राज्यात जिथे जातील तिथे संविधान रक्षणाची भूमिका मांडत आहेत. लोक त्यांना प्रतिसाद देतायत. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राहुल गांधी, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी देशात परिवर्तन घडवून आणण्याचं ठरवलंय. हे परिवर्तन घडून न आल्यास देशात खऱ्या अर्थाने हुकूमशाहीला सुरुवात होईल. प्रकाश आंबेडकर यांचीदेखील हीच भूमिका आहे,” अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. “वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.