भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेते आक्रमक झाले असून राहुल गांधींविरोधात आंदोलन केल जात आहे. असे असतानाच दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असे कोश्यारी औरंगाबादेत बोलताना म्हणाले. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. ते मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> ‘भारत जोडो यात्रे’त सावरकरांचा मुद्दा काढणे गरजेचे होते का? नाना पटोलेंनी मांडली भूमिका, म्हणाले “६० रुपये पेन्शन…”
“शिवाजी महाराजांचे आदर्श हे चिरंतन आहेत. ते जुने कसे होऊ शकतात. याआधी कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी असेच वक्तव्य केले होते. आता शिवाजी महाराज यांच्याविषयीही त्यांनी असेच वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सध्या वादळ उठले आहे. भाजपाचे लोक राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. जे आज रस्त्यावर उतरले आहेत, त्या सर्वांनी आता राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरून आपला मराठी बाणा, स्वाभिमान दाखवावा. आम्हाला काय करायचे आहे, ते आम्ही लवकरच करू,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> आधी आदित्य ठाकरे म्हणाले “…म्हणून टेंडर रद्द केले का?” आता नितेश राणेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले “उद्धव सेनेतील युवराजांची…”
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (१९ नोव्हेंबर) औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेदेखील कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना, “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की, तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
हेही वाचा >>> राहुल गाधींच्या वक्तव्याविरोधात शिंदे गट आक्रमक; मुंबईत निषेध मोर्चा, घोषणाबाजी!
दरम्यान, कोश्यारी यांच्या या विधानानंतर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपाल कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटवावे अशी मागणी केली जात आहे.