पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असा खळबळजनक दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, याच पहाटेच्या शपथविधीविषयी आज (२२ फेब्रवारी) शरद पवार यांनी भाष्य केले. पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठण्यासाठी मदत झाली, असे शरद पवार म्हणाले आहेत. यावरच आता ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार जे बोलले ते सत्य आहे, असे राऊत म्हणाले आहेत. ते आज (२२ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
पहाटेच्या शपथविधीमुळे फक्त २४ मिनिटांत राजष्ट्रपती राजवट उठवण्यात आली
“सरकार स्थापन करताना आम्ही आमदारांचं बहुमत दाखवलं असतं तरी राजभवनातील राज्यपालांनी बहुमतासाठी आमदारांची डोकी मोजायलाच पाच वर्षे लावली असती. पहाटेच्या शपथविधीमुळे कोंडी फुटली. लख्ख उजाडलं. पहाटेच्या शपथविधीमुळे फक्त २४ मिनिटांत राजष्ट्रपती राजवट उठवण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा झाला,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
…अन्यथा राष्ट्रपती राजवट कायम ठेवली असती
“शरद पवार यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. शरद पवार यांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, असे मी म्हणालो होतो. तेव्हा माझ्यावर टीका झाली होती. तुम्हाला आता काय ते कळलेच असेल. शरद पवार यांना पहाटेच्या शपथविधीविषयी माहिती होते की नाही, याबाबत मला कल्पना नाही,” असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच “पहाटेच्या शपथविधीची महाविकास आघाडी सरकारची स्थापना होण्यास मदत झाली. अन्यथा आमच्याकडील बहुमत तोडण्यासाठी राष्ट्रपती राजवट कायम ठेवली असती. मी त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मी आभार मानतो,” असेही संजय राऊत म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केलं आहे.
२३ नोव्हेंबर २०१९ ला नेमकं काय घडलं होतं?
२३ नोव्हेंबर २०१९ ला कुणाला काहीही कल्पना नसताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत ही घडामोड घडली होती त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं मात्र शरद पवार यांनी पुढच्या दोन दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं त्यामुळे हे सरकार गडगडलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याआधीही हा विषय टाळला होता. आज मात्र त्यांनी या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली राष्ट्रपती राजवट उठली असं शरद पवार म्हणाले आहेत.