मागील वषी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यात सत्तापालट झाले. शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडी सरकारला पायऊतार व्हावे लागले. या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उभे दोन गट पडले आहेत. दरम्यान, याच बंडखोरीवर संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. आम्हाला या बंडखोरीबद्दल कल्पना होती. मात्र ज्यांना आमच्यासोबत राहायचेच नव्हते त्यांना थांबवून उपयोग नव्हता, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा >>> “त्यांना माझ्यासमोर आणा, मी..,” अभद्र भाषेत बोलणाऱ्या नेत्यांवर राज ठाकरे संतापले; म्हणाले, “…तर बोलण्याची हिंमत होणार नाही”
बंडाची आम्हाला कल्पना होती
“जे लोक सोडून गेले त्यांचं बंड वगैरे नाही. ते सोडून गेले. पळून गेले. त्यांच्या बंडाची आम्हाला कल्पना होती. ज्यांना पळूनच जायचे आहे, ज्यांना पळून जाऊनच लाग्न करायचे आहे त्यांना आपण रोखू शकत नाही. पूर्वीच्या सिनेमांच्या कथाही तशाच होत्या. पळून जाणाऱ्यांना तुम्ही कसे पकडणार,” असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >>> “२०२४ मध्ये अनेक मोठे धक्के,” देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले, “लोक फार हुशार…”
विश्वास नावाची एक गोष्ट असते
“एक आमदार दहा मिनिटांपूर्वी आमच्या बाजूला बसलेला होता. तो अकराव्या मिनिटाला निघून गेला. तो राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बसलेला होता. मात्र तो खाली उतरला. गाडीत बसून निघून गेला. विश्वास नावाची एक गोष्ट असते ती आम्ही त्यांच्यावर ठेवली. ज्यांनी जायचं त्यांनी जावे, ही आम्ही भूमिका घेतली. शरीराने आमच्यासोबत आणि मनाने सुरत, गुवाहाटीला होते; त्यांना कोंडून काय होणार होते,” असेही संजय राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? थेट प्रश्नावर जयंत पाटलांची तुफान टोलेबाजी, सुधीर मुनगंटीवारांकडे पाहात म्हणाले “फडणवीसांना…”
माझ्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, असे सांगितले गेले
“या ४० लोकांचे वर्षभरापासूनच ठरलेले होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही तीच चर्चा झाली होती. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी मी निष्ठावान शिवसैनिक आहे. माझ्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, असे सांगितले. जेव्हा कोणी मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, असे सांगतो तेव्हा आम्ही विश्वास ठेवतो,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> अशोक चव्हाण यांची मुलगी खरंच राजकारणात सक्रिय होणार? खुद्द अशोक चव्हाण यांनीच दिलं उत्तर; म्हणाले, ” माझ्या मुलींना…”
घाबरले की तुमच्यातील निष्ठा, निर्भयता संपून जाते
“एकनाथ शिंदे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. ते अनेकदा माझ्याशी बोललेले आहेत. त्यांच्या तक्रारीही मी ऐकलेल्या आहेत. या तक्रारी मी पुढेही नेलेल्या आहेत. मात्र एकदा ईडी आणि सीबीआयची बंदूक लावलेली असेल आणि तुम्ही घाबरले की तुमच्यातील निष्ठा, निर्भयता संपून जाते. सगळेच माझ्यासाखे नसतात. माणसाचं मन खंबीर पाहिजे. काहीही झाले तरी पक्षाशी प्रामाणिक राहिले तर अशा घटना घडत नाहीत,” असे म्हणत ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली, असे राऊत यांनी सांगितले.