इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील घटक पक्षांची जागावाटपाबाबतची बैठक मुंबईत आज संपन्न झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीकडून माध्यमांना माहिती दिली गेली. “जागावाटपाची चर्चा योग्य मार्गावर सुरू आहे. काही लोक देव पाण्यात घालून बसले होते. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, महाविकास आघाडी एकजुटीने लढणार आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत पुढे म्हणाले, “आज सकाळपासून आमची चर्चा सुरू होती. लोकसभेच्या ४८ जागांवर व्यवस्थित चर्चा झाली असून बहुसंख्य जागेवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. आता ३० जानेवारीला आम्ही पुन्हा भेटणार आहोत.”
प्रकाश आंबडेकर महाविकास आघाडीबरोबर
वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबडेकर यांच्याबरोबर कालपासून आमचा सुसंवाद सुरू आहे. आज आम्ही त्यांना निमंत्रण पाठविले. त्यांना ते मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली. पुढच्या बैठकीत ते आमच्यासह बैठकीला उपस्थित असतील. वंचित बहुजन आघाडी हा मविआचा प्रमुख घटक पक्ष आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील नेत्यांनीही त्यांच्याशी संवाद साधला.
“या देशातील लोकशाही वाचविणे, संविधानाची सुरू असलेली चिरफाड रोखणे, हुकुमशाहीच्या विरोधात लढणे आणि मोदींची एकाधिकारशाही रोखणे, ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आहे. तीच आमचीही भूमिका आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यामुळे भविष्यकाळात प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एकत्र काम करताना दिसू. त्यांच्याप्रमाणेच राजू शेट्टी यांच्याशीही आमची चर्चा सुरू आहे. याबाबत ३० जानेवारीपर्यंत आणखी स्पष्टता येईल”, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान प्रकाश आंबडेकर आणि नाना पटोले यांच्या आघाडीत सामील होण्यावरून वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर यांना ४५ मिनिटांपूर्वी निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि संजय राऊत यांनी एक्सवर पत्र टाकून निमंत्रण दिले. या पत्रावर जयंत पाटील, संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या स्वाक्षरी होत्या.
त्यानंतर तीन वाजता प्रकाश आंबडेकर यांनीही एक्सवर पोस्ट टाकून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसकडून निर्णय घेण्याचा नाना पटोले यांना कोणताही अधिकार नाही. काँग्रेसचे निर्णय दिल्लीतून घेण्यात येतात. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये घेण्यासंदर्भात नाना पटोले यांच्या शब्दावर आमचा विश्वास नाही, असे स्पष्टपणे प्रकाश आंबडेकर यांनी सांगितले.
दरम्यान प्रकाश आंबडेकर यांच्या आक्रमकतेनंतर नाना पटोले यांनीही एक्सवर महाविकास आघाडीचे पत्र शेअर करून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच ३० जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीचे आगाऊ निमंत्रणच या पत्राद्वारे देण्यात आले.