Sanjay Raut on Ajit Pawar : राज्यात सत्तास्थापनेला वेग आला असून मंत्रिपदासाठीही रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतील घटकपक्षांच्या बैठका सुरू असून कोणाची कोणत्या पदावर वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार हेही उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं जातंय. स्ट्राईक रेटनुसार राष्ट्रवादी शिंदेंपेक्षा मोठा भाऊ ठरत असल्याची चर्चा आहे. यावरून संजय राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
नव्या सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, “अजित पवार भावी किंवा माजी वगैरे नसतात. ते सदैव उपमुख्यमंत्री असतात. कौतुकास्पद आहे. आज त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहतोय. मिश्किल हास्य आहे. गॉगल वगैरे लावून दिल्लीत फिरताना पाहिलं. हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं. त्यांनी ईव्हीएमची पूजा केली पाहिजे. ईव्हीएमला मंदिरात ठेवलं पाहिजे”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले
“काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजपाला वाटत नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत. ज्यांनी मतदान केलंय, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. लोक शंका घेत आहेत. यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे. आज मारकडवाडीत १४४ कलम लावलाय. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. अजून राज्यात सरकार यायचंय. त्या मतदारसंघातून भाजपाचा पराभव झालाय. पण मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कमी मते आहेत. जिंकून सुद्धा फेरमतदान घेत आहेत, कारण कमी मतदान झालंय”, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या मागे महाशक्तीचा पाठिंबा
एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलंय, याबाबत आज संजय राऊतांना विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जे रुसवे फुगवे सुरू आहेत, मला वाटतं दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहे. दिल्लीतील एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे अशाप्रकारचं धाडस करू शकत नाही. कारण कोणाची हिंमत नाहीय सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशाप्रकारे रुसवे फुगवे करण्याची.”