Sanjay Raut on DJ Ban During Holi : वरळी कोळीवाड्यामध्ये होळी धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर डिजेवर बंदी घालण्यात आली आहे. लाऊड स्पीकर लावू न दिल्याने वरळीतील कोळी बांधवांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. सरकारला मराठी सणांविषयी इतका आकस का? असा प्रश्न वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनीही सरकारला विचारला. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून ही बंदी घालण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यावरूनच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “होळीला परवानगी मिळत नाही. गणेशोत्सव येणार आहेत, पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणलेली आहे. वर्षांनुवर्षे येणाऱ्या सणांवर बंधनं आणत आहात. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. आमच्या वातावरणात हिंदूंचे सण खुल्या वातावरणात होतील,असं या सरकारने म्हटलं होतं. पर्यावरणाची इतकीच काळजी आहे तर महाकुंभातील गढूळ पाण्यात लोकांना का अंघोळ का करायला लावली? गटारगंगेत लाखो कोट्यवधि लोकांना डुबकी मारायला लावली अन् महाराष्ट्रात तुम्ही आम्हाला पर्यावरणाच्या गोष्टी सांगत आहात? असं टीकास्त्र संजय राऊतांनी केलं.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?

वरळीतील कोळीवाड्यात डीजेवर बंदी आणल्यानंतर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला होता. ते एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले, “महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून आणि विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित ठेवून छळलं जातंय आणि आता कोळीबांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मीयांसाठी महत्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी ‘माईक आणि लाऊडस्पिकरचे नियम’ दाखवून माझ्या वरळी मतदारसंघातल्या कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरु आहे.”

होळीच्या निमित्ताने मुंबईत नियमावली जारी

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, धुलीवंदनानिमित्त १२ ते १८ मार्चदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणे, अश्लील इशारे करणे आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी जारी केलेल्या आदेशात तसे स्पष्ट करण्यात आले आहे. धुलीवंदनानिमित्त सार्वजनिक ठिकाणी पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी, रंग फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय जातीय तणाव व सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कृत्य करू नये, असेही नमुद करण्यात आले आहे.

Story img Loader