ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार राहुल कूल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कूल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत संजय राऊतांनी आज दौंड तालुक्यातील वरवंड येथे ‘पोलखोल’ सभा घेतली आहे. या सभेतून संजय राऊत यांनी राहुल कूल यांच्यासह भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल कूल यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटींचा गैरव्यवहार केला, तरीही त्यांच्यावर सरकारकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांकडून दोन महिन्यांपासून वेळ मागतोय, पण ते वेळ देत नाही. मी येतो म्हटलं की ते पळून जातात, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं. विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाते, असा आरोपही राऊत यांनी केला.
वरवंड येथील ‘पोलखोल’ सभेत संजय राऊत म्हणाले, “अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, संजय राऊत, अनिल परब आणि तिकडे दिल्लीत मनीष सिसोदिया हे सर्व नेते फक्त विरोधी पक्षाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात. आता शिवसेनेतून जे ४० आमदार तिकडे गेले आहेत. त्यातील १२ जण भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. प्रत्येकावर ईडी आणि सीबीआयचा खटला दाखल आहे.”
“प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी यांच्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाकडून गुन्हे दाखल आहेत. या सगळ्यांना भाजपाने आपल्यात घेतलं, वॉशिंगमशीनमध्ये टाकलं, धुतलं आणि स्वच्छ केलं. आता त्यांच्या खटल्याचं काय झालं रे किरीट सोमय्या… आता काय झालं? पुढच्या वेळी इकडे येताना मी किरीट सोमय्यांना बरोबर आणणार आहे. तो नाही आला तर कॉलर पकडून घेऊन येईन… जरा यह भी भ्रष्टाचार देखो, ५०० करोड का… मिस्टर कूल आप मिस्टर कूल हो, तो मै भी मिस्टर हॉट हू… आपको छोडुंगा नही,” अशा शब्दांत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं.