शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना आमदारांचा मुक्काम आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य शिवसेना नेते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही भाष्य केले.
“खरे अग्निवीर समोर बसले आहेत. तुम्ही कोणाची भरती करणार आहात. सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. जगाच्या पाठीवर असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. मोहम्मद तुघलकानेही कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला नसता. देशाचे रक्षण कोणी करायचे हे ज्यांना कळत नाहीत त्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात देशाचे सैन्य नाही. म्हणून मोदी सरकारच्या निर्णयामुळे अराजक निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शांत आहे कारण सूत्रं उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.
“काही दिवसांपूर्वी मी एक वक्तव्य केलं होतं की श्रीलंकेत जी परिस्थिती निर्माण झाली ती इथेही निर्माण होऊ शकते. त्यावेळी माझ्यावर भाजपाने बरीच टीका केली. पण आता एक महिन्याने देशातील तरुण वर्ग, बेरोजगार रस्त्यावर उतरल आहे.. जे आंदोलन सुरु आहे ते रोखण्यासाठी बिहारमध्ये सैन्य बोलवावं लागलं आहे. याला राज्य करणे म्हणत नाही. राज्य कसं करायचे पाहायचे असेल तर महाराष्ट्रात या. मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थानं करुन राज्य चालवता येणार नाही. हे राज्य सर्वांना एकत्र घेऊन चालवावे लागेल आणि ती क्षमता फक्त उद्धव ठाकरेंकडे आहे. शिवसेनेचा ५६ वर्षांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता इतिहास आहे. ५६ वर्षानंतर न्यायाच्या लढाईमध्ये कोणी पुढे असेल तर ती फक्त शिवसेना आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.
आज जे टिरटिर करत आहेत राणा, फाणा लोक ते एक वेळ अशी येईल की शिवसेनेच्या पायाशी येतील. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तुडवले जाल असाही टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.
हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत – संजय राऊत
“५६ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत एक ठिणगी टाकली. त्यातून देशभरात जो वणवा पेटला आहे त्याचा आज वर्धापण दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आज पितृदिन असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे या देशाला बाप नाही. पण आज मी सांगू इच्छितो की हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. जगभरात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे तो बाळासाहेबांना बापच मानतो आणि बाप एकच असतो. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन हिंदुत्वाचे बाप असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, कसे आहे आणि कोणत्या दिशेने चालले आहे त्याचे कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही,” असे संजय राऊत म्हणाले.