Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेनेचा (ठाकरे गट) नाशिकमध्ये बुधवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणही ऐकायला मिळालं. यामध्ये विशेष माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं. मात्र, यावरून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी टीका केली. आता या टीकेला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी संजय राऊत यांनी शिंदेंच्या पक्षाला अमित शाह यांनी तंबी दिल्याचा दावाही केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने बनावट शिवसेना अमित शाह यांनी स्थापना केली, महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न राबवला जातोय, धमक्या देणं हेच शिंदेंच्या शिवसेनेचं धोरण आहे, नारायण राणे शिवसेनेला सोडून गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी गद्दार शब्द वापरला, तसेच बेडकासारखी उडी मारून काँग्रेसमधून आलेले शंभूराज देसाई आम्हाला शिकवणार का? अशा शब्दांत संजय राऊत यांनी नारायण राणे, एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली.

संजय राऊत काय म्हणाले?

“एक बनावट शिवसेना अमित शाह यांनी सुरु केली आणि महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका बनावट वाटणारच. हे काय काल झालं का? मुंबईत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणाचा अशा प्रकारचा प्रयोग केला याआधीही केला होता. तेव्हा त्यांचं लक्ष गेलं नाही का? अमित शाह यांनी बनावट संघटना तयार केली आणि त्या संघटनेला शिवसेना नाव द्यायला लावलं, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही. त्यांनी धर्मवीर चित्रपट काढला, मग आनंद दिघे यांच्याबाबत त्यामध्ये बनावट संवाद तुम्ही निर्माण केले, ते तुम्हाला चालले का?”, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

‘अमित शाह हे शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख…’

“अमित शाह हे शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही जर अमित शाह यांच्यावर काही बोललो तर मग शिंदे गटाची तक्रार करणं योग्य आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांबाबत बोललो तर त्यात शिंदेंच्या शिवसेनेचा काय संबंध?”, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली.

शंभुराज देसाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर

शंभुराज देसाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, “आम्हाला शंभुराज देसाई शिकवणार का? बेडकासारखी उडी मारून काँग्रेसमधून आलेले शंभुराज देसाई आम्हाला शिकवणार का? महाराष्ट्राची एवढी अवस्था खराब झालेली नाही. दुसरं असं आहे की त्यांनी इतिहास वाचावा. गद्दारांना क्षमा नाही. हे जरा शंभुराज देसाई यांनी समजून घ्यावं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘अमित शाह यांची शिंदे गटाला तंबी…’

“अमित शाह यांनी शिंदे गटाला तंबी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची चाकरी करा किंवा सरकारमधून दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे की त्यांच्यात काय चर्चा होतात. त्यांनी देखील त्यांच्या नेत्यांना सांगितलं की आपण येथेच राहू, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याबाबत काही शिकवू नये”, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली.

“महाजन जरा ऐकून घ्या…”, संजय राऊत

गिरीश महाजन यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, “गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ का बिघडलंय? हे आपल्याला माहिती आहे. अनेक खटलेबाजीत ते अडकले आहेत. त्यामुळे त्यांना माहिती नाही. शिवजयंतीला देशात सुट्टी जाहीर करावी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. फक्त महाराष्ट्रात नाही. मिस्टर महाजन जरा ऐकून घ्या, कानातले बोळे काढा. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी का केली? अमित शाह हे रायगडावर आले होते आणि त्यांनी जे काही प्रवचन दिलं. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की तुम्ही खरंच शिवभक्त असाल तर शिवजयंतीला देशात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा”, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.