“अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांनी काल (६ ऑगस्ट) पुण्यात केले. यावरून संजय राऊतांनी आज टीकास्र सोडलं आहे. आज ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.
अमित शाहांनी अजित पवारांचं कौतुक केल्याने हेच कौतुक २०२४ नंतरही कायम ठेवा, असं संजय राऊत म्हणाले. ‘दादा योग्य जागी आहेत असं अमित शाह म्हणाले. हे २०२४ नंतरही बोला. दादा नक्की कुठे आहेत? या राज्याचं आणि देशाचं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यानुसार योग्य आणि अयोग्य याच्या व्याख्या कोणी ठरवू नयेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली
हेही वाचा >> “राहुल गांधींना SCने न्याय दिला, पण…”, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “गुजरातच्या भूमीवरून…”
“कालपर्यंत जे भ्रष्टाचारी होते, नॅचरल करप्ट पार्टी होते, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, या सिंचन घोटाळ्याचा नेता अजित पवार असं अमित शाह म्हणाले होते. आज ते योग्य जागी आहेत”, असा उपहासात्मक टोलाही संजय राऊतांनी लगावला.
हेही वाचा >> “अजित पवार यांची जागा…”, केंद्रीय अमित शाह यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठे वक्तव्य; म्हणाले, “पण उशीर केला…”
अमित शाह काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आज पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांनी केले.
मणिपूर सरकार बरखास्त करा
“मणिपूरचं सरकार बरखास्त व्हायला पाहिजे.मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. इतर राज्यात अशाप्रकारचा हिंसाचार घडला असता तर या भाजपाने राष्ट्रपतींना सांगून तिथे राष्ट्रपती राजवट लावली असती. पण मणिपूरमध्ये त्यांचं राजकारण वेगळं चालू आहे. भूमिगत राजकारण सुरू आहे. ईशान्येकडे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मणिपूरच्या दंगलीमध्ये चीनचा हात आहे, हे समोर आलं आहे. तरीही पंतप्रधान त्यांची चुप्पी तोडत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार देशाला करावा लागेल”, असंही संजय राऊत आज म्हणाले.
…तर राहुल गांधींना लोकसभेत प्रवेश मिळणं गरजेचं आहे
राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक लढाईत आम्ही त्यांच्यासोबत राहू. राहुल गांधींना लोकसभेत ताबडतोब प्रवेश दिला पाहिजे. सरकारमध्ये हिंमत असेल, सरकार लोकशाही मानत असेल, सर्वोच्च न्यायालय मानत असेल तर विनाविलंब आजच राहुल यांना लोकसभेत आत प्रवेश मिळणे गरजेचे आहे.