महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींच्या या वक्तव्यावरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. “५० खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत”, असं म्हणत राऊतांनी हल्ला चढवला. संजय राऊत यांनी राज्यपालांचा हा वादग्रस्त व्हिडीओ ट्वीट करत चार ट्वीट करत टीका केली.
“भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू”
संजय राऊत आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. ऐका, ऐका.”
“५० खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत”
“काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी आणि आणि आता काय हा मराठी माणूस. महाराष्ट्राचा घोर अपमान! ५० खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत,” असा सवाल संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये केला.
“थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा”
तिसऱ्या ट्वीटमध्ये राऊत म्हणाले, “थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. १०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल, तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय?”
“शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा”
“आता तरी ऊठ मराठ्या ऊठ. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल,” असं मत राऊतांनी आपल्या चौथ्या ट्वीटमध्ये व्यक्त केलं.
भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”
व्हिडीओ पाहा :
“गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे”
सचिन सावंत म्हणाले, “राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.”