उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट व २०१९ मधील पहाटेचा शपथविधी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. “ज्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींना हे चक्की पिसायला तुरुंगात टाकायला निघाले होते, ते देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत,” अशी टीका राऊतांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “ज्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींना हे चक्की पिसायला तुरुंगात टाकायला निघाले होते, ते देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत. शिंदे गटातील २५ पेक्षा जास्त आमदारांवर ईडी, सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत. तेही फडणवीसांच्या बाजूला बसले आहेत. त्यांनी जरा याविषयीही बोलावं, मग भुतकाळात काय घडलं आणि काय नाही यावर चर्चा करावी.”

“त्यांनी त्यांचा एक भंपक माणूस राजभवनात आणून बसवला”

“महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे. फडणवीसांनी त्यावर बोलावं. मात्र, ते अजूनही राष्ट्रपती राजवटीवरच बोलत आहेत. त्यांनी त्यांचा एक भंपक माणूस राजभवनात आणून बसवला. त्याच्या माध्यमातून ते हे सर्व करून घेत होते. त्या काळात राजभवन राजकीय गुंडांचा अड्डा झाला होता. फडणवीस आमच्यावर काय आरोप करत आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“…मग फडणवीस शिंदे-पवारांना हवा घालत बसणार आहेत का”

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर बोलताना म्हटलं होतं की, या सरकारमध्ये पूर्ण काळ एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि जेव्हा अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तेव्हा त्यांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “फडणवीस एकनाथ शिंदेंना या सरकारच्या काळात पूर्ण काळ मुख्यमंत्री ठेऊन अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करणार असं म्हणत आहेत. असं असेल तर मग फडणवीस शिंदे-पवारांना हवा घालत बसणार आहेत का.”

“दिल्लीने फडणवीसांचं मातेरं आणि पोतेरं केलं”

“देवेंद्र फडणवीस स्वतःच त्यांचा स्वतःचा अपमान करत आहेत. दिल्लीने फडणवीसांचं ज्या पद्धतीने मातेरं आणि पोतेरं केलं आहे त्याची आम्हाला लाज वाटते. आम्हाला फडणवीसांची दया येते. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आणि विधीमंडळ अध्यक्षांनी कायद्याने वागायचं असं मनात आणलं, तर एकनाथ शिंदे पाच मिनिटेही मुख्यमंत्रिपदावर राहू शकत नाही,” अशी टीका राऊतांनी केली.

हेही वाचा : “मोदी सरकारच्या ‘पार्टनर’ उद्योगपतीचा पर्दाफाश केला तेव्हा…”, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

“अजित पवारांचीही आमदारकी जाणार आहे”

“देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना पाच वर्षे मुख्यमंत्री ठेवणार हे काय सांगत आहेत. त्यांनी शिंदेंना बेकायदेशीरपणे त्या पदावर बसवलं आहे. अजित पवारांचीही आमदारकी जाणार आहे, जर ते कायद्याने, घटनेनुसार वागणार असतील तर. २०२४ नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनाही फार मोठा राजकीय धक्का बसलेला असेल,” असा दावा संजय राऊतांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticize devendra fadnavis over allegations of president rule in maharashtra pbs
Show comments