मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हिंसाचार उफाळला आहे. आतापर्यंत या घटनेत ६० जणांचा मृत्यू तर १७०० घरे जळून खाक झाली आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात बोलताना भाजपाला लक्ष्य केलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील राज्याराज्यातील भाजपा नेते, राज्यांचे मुख्यमंत्री यांनी कर्नाटकात ठाण मांडलं. कर्नाटक निवडणुकीकरता पैशांचा महापूर आला. अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच त्यांना गदाने मारणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> १७०० घरांची राखरांगोळी, ६० जणांचा मृत्यू… मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता!
“१३ तारखेला पाहा, हनुमानाची गदा यांच्यावर पडणार आहे. तिकडे मणिपूरला का चाललंय, जम्मूमध्ये पाच सैनिक मारले गेले. भारत-पाकिस्तानच्या सीमेवर आग लागली आहे. आणि आमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री कर्नाटकच्या निवडणुकीत बिझी राहतात. मणिपूर पेटलंय, मणिपूर हातातून गेलंय आणि तुम्ही निवडणूक प्रचारात रोड शो करत आहात. बऱ्याच गोष्टी करत आहेत”, असाही टोलाही त्यांनी लगावला.
“गृहमंत्री कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव होताना दिसतोय. कर्नाटकचा निकाल लागायचा तो लागेल, शिवसेनेची भूमिका सीमाप्रश्नी तीव्र आहे. गेल्या ६५ वर्षांपासून आम्ही लढा देतोय, आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यांचे विचार पुढे नेतोय असं सांगणारा कोणताही मायका लाल हा बेळगाव सीमाभागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभावासाठी पराभव करत नव्हता. गेल्या सात वर्षांत फडणवीस आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव व्हावा म्हणून शर्थ केली. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या टोळीने कोट्यवधी रुपये पाठवले आहेत. मँगलोरला उतरले आणि तेथून पुढे पैसे पाठवले”, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.