राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत अनेक मुद्द्यावंर सविस्तर चर्चा केली आहे. तसंच, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही आता सरकारवर टीकास्र डागलं आहे. राज्यात सध्या शिंदे-पवार-भाजपा असं ट्रिपल इंजिन सरकार आहे. या ट्रिपल इंजिन सरकारवरूनच संजय राऊतांनी घणाघात केला आहे. संजय राऊतांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मणिपूरध्ये सुरू असलेल्या हिंसाचारप्रकरणीही केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.
“मणिपूरचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरेंनी मणिपूरविषयी चिंता व्यक्त केली. ज्या मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य नाही, घटनेचं राज्य नाही, केंद्र सरकार ते आणू इच्छित नाही. ते केंद्र सरकार कोणत्या तोंडाने समान नागरी कायदा आणणार असा त्यांचा (उद्धव ठाकरेंचा) प्रश्न आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “कुणाच्या लग्नापुरता…”, समान नागरी कायद्यावरून उद्धव ठाकरेंनी मांडले परखड मत
“गोवंश हत्याबंदीचा कायदा प्रत्येक राज्यात वेगळा लावत आहेत. प्रत्येक राज्यात तुमची भूमिका वेगळी आहे. राजकारणानुसार सोयीची भूमिका आहे. समान नागरी कायदा तुमच्या राजकीय फायद्याकरता का आणता आहात?, असा सवालही राऊतांनी यावेळी विचारला.
प्रत्येकाला वेगळा कायदा
“भ्रष्टाचारासंदर्भात जे आपल्या पक्षात येतील त्यांना वेगळा कायदा, जे तुम्हाला विरोध करतील त्यांना वेगळा कायदा. हे समान नागरी कायद्याचं लक्षण नाही. इथे आधी समान कायदा लावा, मग समान नागरी कायदा आणा हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत परखडपणे सांगितलं आहे”, असंही राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “राष्ट्रवादी एवढा भ्रष्टाचारी पक्ष आहे तर…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “ही कूटनीती…”
दुसऱ्यांचे डबे घेऊनच सरकार चालवणार का?
“राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. पूर्वी एक इंजिन होतं, मग डबल इंजिन झालं आता ट्रिपल इंजिन आहे. अशा किती इंजिनावर सरकार चालणार आहे? या सरकारकडे स्वतःही ऊर्जा, स्वतःचं इंधन आहे की नाही? की दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार आहे? असा प्रश्नही राऊतांनी विचारला.