शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे या आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखल्या जातात. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांना लगावलेलेल खोचक टोले चर्चेचा विषय ठरतात. पण, अलीकडच्या काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी वारकरी संप्रदायाविषयी वक्तव्य करण्यात आलेले व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यांच्या विधानांमुळे वारकरी संप्रदायाकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी सुषमा अंधारेंनी माफी मागितली आहे. तरीही वारकरी संप्रदायाने अंधारेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. “भाजपाच्या डोक्यातून वळवळणारे हे किडे आहेत. वारकरी संप्रदायाविषयी आम्हाला नितांत आदर आहे,” अशी स्पष्टोक्ती संजय राऊतांनी दिली.
“अनेक वारकरी संप्रदायातील लोक आमच्याशी चर्चा करत आहेत. पण, भाजपाचा एक गट आहे, तो हे उद्योग करत आहे. त्यांनी हे करु नये, यामुळे वारकरी संप्रदायाची बदनामी होत आहे,” असे संजय राऊतांनी म्हटलं.
“भाजपा पुरस्कृत वारकरी संप्रदायाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, काही वक्तव्य केलं नाही. भाजपाने आपल्या राज्यपालांचा निषेध केला का? मग तुम्ही सुषमा अंधारेंवरती का बोलत आहात. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपाची वक्तव्ये आहेत. त्याच्यावर तोंडात मूक गिळून गप्प बसायचे, कुलूप लावायचे. २० ते २५ वर्षापूर्वीच्या क्लीप काढून वातावरण खराब केलं जात आहे. पण, काही होणार नाही. वैफल्यातून हे सर्व सुरु आहे. याच वैफल्यातून या पक्षाचा अंत होईल, असं वाटतं,” असेही संजय राऊतांनी सांगितलं.