कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराची राळ उठविली जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे स्टार प्रचारक कर्नाटकात तळ ठोकून आहेत. तसेच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे भाजपाचा प्रचार करून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचं ते म्हणाले. ट्वीट करत राऊतांनी यासदंर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – भरत गोगावलेंना बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंनी केलं लक्ष्य; म्हणाले, “शंभर नाहीतर…”
काय म्हणाले संजय राऊत?
“महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक उचापती आहेत, त्यांना आम्ही धडा शिकवू, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलं आहे. त्याच बोम्मईंच्या पंखाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहत आहेत. सीमावादानंतर शिंदे व त्यांची टोळी या भागात फिरकलीसुद्धा नाही. याउलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून त्यांनी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
“सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे. त्यांची शिवसेना ही नकली शिवसेना आहे. हे यांचं ढोंगी हिंदूत्त्व आहे. शिंदे महाराष्ट्राचे वैरी आहेत. बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “अकरा ते १३ मे दरम्यान देवेंद्र फडणवीसांना धक्का लागला, तरी…”, सुषमा अंधारेंचं सूचक विधान
मुख्यमंत्री कर्नाटक दौऱ्यावर
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आणि उद्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते कर्नाटकामध्ये भाजपा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतील. तसेच कापू आणि उडुपीमध्ये होणार भाजपाच्या रोडशोसुद्धा ते सहभागी होतील. सोमवारी उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरालाही भेट देऊन संध्याकाळी महाराष्ट्रात परतणार असल्याची माहिती आहे.