राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांनी मंगळवारी विधानभवनात शपथ घेतली होती. या शपथविधीनंतर विरोधकांकडून सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना अशाप्रकारे आमदारांची नियुक्ती करणं घटनाबाह्य आहे, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, यावरूनच आता शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही शिंदे सरकार टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सात आमदारांच्या शपथविधीवरून सरकारला लक्ष्य केलं. “निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सात आमदारांना शपथ देण्याचा जो निर्णय घेतला, तो घटनाबाह्य आहे. मुळात पहिली यादी राजभवनात प्रलंबित आहे. ही यादी ठाकरे सरकारने पाठवली होती. तरीही दुसरी यादी घाईत पाठवण्यात आली. आम्ही जी पहिली यादी पाठवली होती. त्यातील नावांची चौकशी तेव्हाच्या राज्यपालांनी केली होती. मग आता जी सात नावं पाठवण्यात आली, त्यांच्या संदर्भात राज्यपालांनी कोणती चौकशी केली?” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Sanjay Raut on Baba Siddique: “गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा नको, आता त्यांना…”, संजय राऊत यांची जहरी टीका

“ज्यांनी शपथ घेतली, ते सर्व राजकीय कार्यकर्तेच आहेत. त्यात धर्मगुरुही आहे. त्यातले एक सदस्य इद्रीस नायकवाडी त्यांचा इतिहास काय? तर त्यांनी वंदे मातरमला विरोध केला होता. सांगली महापालिकेत वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता, आता तुमचा हिंदुंचा गब्बर कुठे आहे? हिंदुत्वाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत. वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता आणि त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. ही सगळी भंपक लोकं आहेत”, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – Sanjay Raut : “सरन्यायाधीश साहेब, तुम्हाला रात्रीची झोप कशी लागते?” संजय राऊतांचा थेट हल्लाबोल; ‘या’ निकालाचा दिला दाखला!

पुढे बोलताना, “याच इंद्रीस नायकवाडी यांनी एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्यामुळे सरकारची नियत आणि निती काय आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. अजून सुद्धा इतर सहा जणांच्या कुंडल्या आम्ही काढू शकतो. पण सरकारने वंदे मातरमला विरोध केलेल्या व्यक्तीला आमदार केलं. हे आम्हाला महाराष्ट्राला सांगायचे आहे. आता त्यांना हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवायचे अधिकार नाहीत”. असंही संजय राऊत म्हणाले.