Sanjay Raut : वक्फ बोर्डाच्या दोन लाख कोटींच्या जमिनी आणि हिंदुत्व यांचा काय संबंध आहे? आम्ही हिंदुत्वाचं मोठं काम केलं असं भाजपाकडून सांगितलं जातं आहे. भाजपा हिंदूंना मूर्ख समजतं आहे का? दोन लाख कोटींच्या जमिनी यांना खायच्या आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच एकनाथ शिंदेंवरही त्यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

मुंबईत वक्फच्या जमिनींवर अनेक उद्योगपतींची घरं उभी आहेत. हे सगळं कायदेशीर करण्यासाठी वक्फचं सुधारणा विधेयक आणलं आहे. मोठे उद्योगपती कोण ते सगळ्यांना माहीत आहे. २०१४ ते २०२४ या काळात या सरकारला गरीब मुस्लिम, वक्फचा घोटाळा वगैरे काही दिसलं नाही. २०१४ ते २०२४ पर्यंत सगळी सार्वजनिक संपत्ती विकून झाली. आता विकायला काहीच उरलं नाही म्हणून वक्फच्या मालमत्तांकडे लक्ष गेलं. सगळा देश विकून झाल्यावर ही दोन लाख कोटींची संपत्ती दिसली. त्यानंतर विधेयक आणलं गेलं. या मालमत्ता, संपत्तीचा गरीबांना काय फायदा होणार आहे? हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि जमिनी बळकवायच्या हे यांचं धोरण आहे. माझ्यावर टीका करु द्या, मी खरं बोलतो आहे म्हणून माझ्यावर टीका होते आहे.

अमित शाह यांनी रिक्त जमिनी विकू म्हटलंच आहे-राऊत

२०२५ पर्यंत मशिदी, मदरसे यांना आम्ही हात लावणार नाही, पण रिक्त जमिनी विकून गरीब मुस्लिमांना पैसे देऊ असं अमित शाह म्हणाले, रिक्त जमिनी विकण्याचा विषय त्यांनी काढला आहे. बेचेंगे आणि खरिदेंगे आलं आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली देश विकून झाला आता वक्फच्या मालमत्ता विकत आहात. भविष्यात ख्रिश्चन, जैन, पारशी यांच्या मालमत्ताही विकल्या जातील कारण यांना फक्त विकायचं आहे. अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांची टीका

एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट थांबवला जातो आहे असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, मी गणेश नाईकांनी काय म्हटलं आहे? यावर कसं मत व्यक्त करु? एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. एकनाथ शिंदे त्या ड्रीम प्रकल्पाला काही मंजुरी मिळाली नाही. त्यांचा पक्ष एसंशि आहे. शिवसेना आजही भक्कमपणे उभी आहे. असं संजय राऊत म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे यूटी म्हणजे यूज अँड थ्रो असं उद्धव ठाकरेंना म्हणाले आहेत असं विचारलं असता राऊत म्हणाले, “युज अँड थ्रो मध्ये बी आहे ना बाळासाहेब ठाकरे आहेत. बाप मधे आहे ना तो कसा विसरता? जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत कुणी काही करु शकत नाही.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.