राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. २ जुलै) लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख बालबुद्धी असा केला. या उल्लेखावरून आता विरोधक पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. “नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावलं आहे. ४०० पार म्हणता म्हणता ते जेमतेम २०० पार गेले. याला राहुल गांधी जबाबदार आहेत. तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावे. कारण मोदींच्या हुकूमशाहीवर विरोधी पक्षाचा दबाव आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक आधार आहे. त्या पदवरील व्यक्तिला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो व्यक्तिचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे. म्हणून आम्ही संविधान धोक्यात आहे, असे म्हणतो. मोदी संविधान, घटना मानायला तयार नाहीत. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला आणि याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावं लागलं”, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
संजय राऊत पुढे म्हणाले, “याच बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्याच भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्थता सत्ताधारी पक्षात आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पाठीशी २३४ खासदारांचे बळ असताना तुम्ही त्यांना संसदेत अशाप्रकारे अपमानित करू शकत नाहीत. यावरून तुमची संस्कृती दिसून येते.”
Live : अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची हजेरी, महायुतीत पुन्हा ठिणगी?
तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लादली असती
राज्यसभेत बोलत असताना संजय राऊत यांचा माईक बंद करण्यात आला होता. यावर भाष्य करताना ते म्हणाले की, लोकसभेमध्ये भाजपाने काही जागा कशा चोरल्या, हे मी सांगत असताना माझा माईक बंद करण्यात आला. भाजपाकडून सारखं सारखं आणीबाणीचा विषय काढण्यात येत आहे. मला यावरच बोलायचे होते. ५० वर्षांपूर्वी झालेल्या आणीबाणीचा विषय आणखी किती वर्ष उगाळत बसणार आहात? दिल्लीच्या रामलीला मैदानावरून लष्कराने बंड करावे, असे आवाहन केले गेले होते. या आवाहनानंतर देशात अराजक माजेल, अशी भीती निर्माण झाली होती. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्याजागी अटल बिहारी वाजपेयी असते तरी त्यांनीही आणीबाणी लादली असती, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
हाथरससारखी घटना नवी मुंबईतही घडली
हाथरसमध्ये सत्संगदरम्यान चेंगराचेंगरी होऊन १२१ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलत असताना संजय राऊत म्हणाले की, हाथरससारखं प्रकरण नवी मुंबईतही घडलं होतं. अमित शाह यांच्या समोरच चेंगराचेंगरी होऊन काही लोक मृत्यूमुखी पडले होते. अशाप्रकारच्या सत्संगावर बंदी आणली पाहीजे, कुणासाठी हे सत्संग भरविले जात आहेत. याची जबाबदारी राज्य सराकरवर टाकली पाहीजे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.