राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. २ जुलै) लोकसभेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख बालबुद्धी असा केला. या उल्लेखावरून आता विरोधक पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. शिवसेना उबाठा गटाच्या संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. “नरेंद्र मोदी यांनी बहुमत गमावलं आहे. ४०० पार म्हणता म्हणता ते जेमतेम २०० पार गेले. याला राहुल गांधी जबाबदार आहेत. तेच राहुल गांधी पंतप्रधानांसमोर विरोधी पक्षनेते म्हणून बसले आहेत. त्यांना बहुतेक हे सहन होत नसावे. कारण मोदींच्या हुकूमशाहीवर विरोधी पक्षाचा दबाव आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पदाला घटनात्मक आधार आहे. त्या पदवरील व्यक्तिला पंतप्रधान बालबुद्धी म्हणत असतील तर तो व्यक्तिचा अपमान नसून संविधानाचा अपमान आहे. म्हणून आम्ही संविधान धोक्यात आहे, असे म्हणतो. मोदी संविधान, घटना मानायला तयार नाहीत. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला घाम फोडला आणि याच बालबुद्धीच्या नेत्यामुळे तुम्हाला बहुमत गमवावं लागलं”, अशी टीका शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा