बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईनंतर काँग्रेसह विरोधीपक्षांनी मोदी सरकार जोरदार टीका केली आहे. बीबीसीने गुजरात दंगलीबाबत माहितीपट प्रकाशित केल्यामुळेही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा – फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले “शरद पवारांनी…”
काय म्हणाले संजय राऊत?
बीबीसीवरील कारवाईची वेळ बरच काही सांगून जाते. मात्र, या कारवाईमुळे भारताची लोकशाही प्रतिमा मलिन होत आहे. भारतातील लोकशाही धोक्यात आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच न्यायपालिका आणि पत्रकारिता हे दोन लोकशाहीचे स्तंभ असून ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू, असेही ते म्हणाले.
काँग्रेससह विरोधीपक्ष आक्रमक
दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसनेही मोदी सरकावर टीकास्र सोडलं आहे. “अगोदर बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता बीबीसीवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. ही तर अघोषित आणीबाणी आहे”, असं ट्वीट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा – “५६ इंचाची छाती किती भित्री, हे…”; BBCवरील कारवाईवरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका!
भाजपाचे काँग्रेसला प्रत्युत्तर
दरम्यान, यासंदर्भात बोलताना, “इंदिरा गांधी यांनीदेखील बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवण काँग्रेसने ठेवली पाहिजे. भारतात प्रत्येक संस्थेला कायद्याचे पालन करून काम करण्याची संधी दिली जाते. मात्र त्यासाठी त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा. काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी तसेच दहशतवाद्यांच्या बाजूने का उभा राहतो,” अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.