शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, यावरून विविध राजकीय चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवायला लागले, असे ते म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “…म्हणून भूषण देसाईंनी शिंदे गटात प्रवेश केला”, वैभव नाईक यांचा दावा
काय म्हणाले संजय राऊत?
“सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचे चिरंजीव शिवसेनेत नव्हते. काल सुभाष देसाईंनी निवदेन जारी करत भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते, हे स्पष्ट केले आहे. पण मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरू आहे, ती कुचकामी आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“मग उदय सामंत यांच्या आरोपांचं काय झालं?”
“उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईंवर काही आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांनी आता भूषण देसाई यांना भाजपाच्या वाशिंगमशीनमध्ये टाकून आपल्या बाजुला बसवले आहे. ही भाजपाच्या वाशिंगमशीनची कमाल आहे. मग उदय सामंत यांच्या आरोपांचं काय झालं?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.