काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजपासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…नाहीतर जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा इशारा!

प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “यांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांबाबत जे अत्यंत दळभद्री विधान केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. त्याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केलं आहे, हे प्रसारमाध्यमांच्या नजरेतून का सुटतं आहे मला कळत नाही? ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा. संभाजी राजांचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपाचे आता सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत.”

हेही वाचा – “महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे; आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेना सवाल!

याशिवाय, “वीर सावरकरांबाबत आपण रस्त्यावर उतरलात स्वागत आहे. जोडे मारले स्वागत आहेत. आता हे जोडे तुम्ही कोणाला मारणार आहात? भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अशाप्रकारे घोर अपमान केला. ” असंही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!

सुधांशु त्रिवेदी नेमंक काय म्हणाले? –

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले? –

“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes bjp and chief minister shinde over controversial statements made by rajyapal koshyari and bjp spokesperson sudhanshu trivedi regarding chhatrapati shivji maharaj msr
Show comments