शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर टीका केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीने सातत्याने अपमान, आमच्या आरध्य दैवतांचा अपमान भाजपाच्या आराध्य दैवतांकडून म्हणजेच राज्यपाल कोश्यारी त्यांचे राष्ट्रीय प्रवक्त्यांकडून होत आहे. त्यांना वाटत असेल की हे जे राजकारण सुरू आहे त्या पद्धतीने हा विषय सुद्धा आम्ही बाजूला करू. महाराष्ट्रावर कर्नाटककडून जो अन्याय होतोय. विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे. तुम्ही म्हणाल कधी, कोणत्या क्षणी? कोणत्याही क्षणी जो अॅक्शन प्लॅन आहे त्या संदर्भात व्यवस्थित हालचाली सुरू आहेत.”
याशिवाय “आम्ही वाट बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, आमदार जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार हे अजुन हात चोळत कसे बसले आहेत, किती वेळ बसणार आहेत हात चोळत, तोंड शिवून? हे आम्ही पाहतो आहोत, महराष्ट्राला आम्ही दाखवतो आहोत. की बघा हा त्यांचा स्वाभिमान, हा त्यांचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर हे सरकार आणि त्यांचे आमदार हे मुठी आवळून उसळून उभे राहत नाहीत. या लोकांना शिवसेना फोडली कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जी पावलं उचलायची आहेत, ती आम्ही उचलतोच आहोत.” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.