भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची अद्याप घोषणा केलेली नाही. याच कारणामुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना थेट ऑफ दिली आहे. नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीत यावे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. ठाकरेंच्या याच विधानानंतर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरेंवर सडकून टीका केलीय. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या याच विधानानंतर आता ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट टाकून भाजपाला डिवचलंय. गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच भाजपाने त्यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

नितीन गडकरी यांच्या उमेदवारीबाबत संजय राऊत यांनी एक्सवर सविस्तर लिहिलं आहे. “सत्य असे आहे की, देवेंद्र फडणवीस हे मोदी शाह यांच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत. ते महाराष्ट्राचे, नागपूरचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाव असायलाच हवे असा आग्रह ते करू शकले असते. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे महाराष्ट्राची यादी प्रलंबित आहे, हा केवळ बहाणा आहे. गडकरींच्या नागपूर मतदारसंघाचा महायुतीच्या जागावाटपाशी कवडीचाही संबंध नाही. गडकरींना अपमानित करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या उमेदवारीची घोषणा टाळण्यात आली असून या कारस्थानात केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून फडणवीसही आनंदाने सामील झाले आहेत,” असा दावा संजय राऊतांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तरं दिलं?

नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी ऑफर दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. “ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं आहे. नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या नागपूरमधून लढतात, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव नव्हतं. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल. त्यामुळे मला वाटतं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी काय ऑफर दिली?

भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. नितीन गडकरी हे भाजपामधील मोठं नाव आहे. शिवाय ते केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे या या पहिल्या यादीत गडकरींचं नाव असेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र अनपेक्षितपणे या यादीत गडकरींच्या नावाचा समावेश नाही. महाराष्ट्रातील महायुतीमधील जागावाटप अद्याप बाकी आहे, असा तर्क यामागे देण्यात आला. मात्र उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींना थेट ऑफर देऊन टाकली. “दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच झुकले नव्हते. आताचा महाराष्ट्र तरी कसा झुकेल? काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र भाजपा वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticizes bjp over nitin gadkari candidature for lok sabha election 2024 prd