राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. याच कारणामुळे विरोधी बाकावरील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राज्यपालांचा राजीनामा घ्यावा तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. फडणवीसांच्या याच भूमिकेवर आता उद्धव ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राविषयीचे प्रेम खरे नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. ते आज (२१ नोव्हेंबर) सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> “…म्हणूनच एका व्यासपीठावर येण्यास अडचण आली नाही”, उद्धव ठाकरेंकडून प्रकाश आंबेडकरांचे तोंडभरून कौतुक
“राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे आम्हाला समर्थन करता आले असते. मात्र आम्ही तसे केलेले नाही. आम्ही राहुल गांधी यांचा बचाव केलेला नाही. हाच आमच्यात आणि भाजपात फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर दुसरं कोणी काही बोललं असतं तर भाजपाने थयथयाट केला असता. मात्र आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्ये करत आहेत. हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. तरीदेखील तुम्ही त्यांचा बचाव करत आहात. म्हणजेच तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भातील त्यांचे प्रेम खरे नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच महाराष्ट्रातील जनता राज्यपालांना माफी मागायला लावेल, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा >>> वीर सावरकरांवरील वक्तव्यानंतर राज्यात संताप, आता राहुल गांधींचा थेट संजय राऊतांना फोन, कोणत्या विषयांवर चर्चा?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काल (२० नोव्हेंबर) राहुल गांधी यांनी संजय राऊतांना फोन केला. त्याची माहितीही संजय राऊतांनी दिली. “राहुल गांधी यांनी मला काल रात्री फोन केला होता. याआधीही त्यांनी माझी चौकशी केलेली आहे. मात्र त्यांनी काल प्रत्यक्ष फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. आम्हाला तुमची काळजी होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती, असे राहुल गांधी मला म्हणाले. त्यांनी माझी प्रेमाने चौकशी केली,” असे संजय राऊत यांनी सांगितले.