विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करीत तारीख निश्चित केली नसली तरी ही निवडणूक मंगळवारी घेण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात करण्यात आलेले बदल हे घटनेतील तरतुदींशी सुसंगत आहेत का, हे तपासण्यात येत असल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला संमती नाकारली आहे. त्यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले उत्तर तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करु नये असं मी कालही म्हणालो होतो. घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणुक होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यावर पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल महाराष्ट्राचं आरोग्य खातं सक्षम आहे. ते उपचार करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
“राज्यपाल जर घटनेच्या विरुद्ध वागत असतील किंवा अशा प्रकराचे राजकीय वर्तन करावे असा दबाव असेल तर सरकारला सुद्धा राजकीय पावलेच टाकावी लागतील,” असेही संजय राऊत म्हणाले.
“राज्यपालांनी इतका अभ्यास करणं बरं नाही, अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे,” संजय राऊतांचा टोला
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीमध्ये नियमबदलाबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्यानंतर याआधीही बोलताना संजय राऊत यांनी राज्यपालांना इतका अभ्यास बरा नाही असा टोला लगावला होता. “आपले राज्यपाल आपले फार अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही. हे अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. एकतर मुळात लॉकडाउनमध्ये अभ्यास कमी झाला आहे, त्यात तुम्ही असा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करु लागलात. घटनेत काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या असून त्यानुसार तुम्हााल काम करायचं आहे. घटनेत मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी मान्य कराव्यात असं लिहिलं असून हे बंधनकारक आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीचं अद्याप काही झालेलं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून निवडणुकीला अजुनही अनुमती मिळालेली नाही. राज्यपालांनी पत्राद्वारे आपला निर्णय राज्य सरकारला कळवला होता. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत उत्तर दिले असून, त्यात विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत, याकडे लक्ष वेधले. यावरून राज्यपाल विरुद्ध सरकार असा पत्रसंघर्ष सुरू झाला. त्यातच अध्यक्षपदासाठी मंगळवारीच निवडणूक होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केल्याने अध्यक्षांच्या निवडणुकीचा तिढा निर्माण झाला आहे.