राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्य्यांवरून शाब्दिक खडाजंगी, आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. याशिवाय विरोधक सत्ताधारी आमदार, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “एकाच गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येताय आणि सगळी प्रकरणं गंभीर आहेत. काही लोक म्हणताय बॉम्ब कुठं फुटताय? मग हे फुटताय ते काय आहे? एनआयटी घोटाळा १६ भूखंडांचा अजून येईल हे टोकन आहे. संजय राठोड यांच्या दोन जमिनींचे भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कलेक्शगिरी, कृषी कर्मचाऱ्यांना पकडून कोट्यवधी रुपये गोळा केले जाताय, ३६ एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडीसारखी वाटली. मी परत सांगतोय ही तर सुरुवात आहे. उद्योगमंत्री उदय सामंतांचं प्रकरण, उदय सामंतांचं एक प्रकरण नाही. आता या क्षणी आमच्या खोलीत २५ प्रकरणं पडली आहेत. पण सीमा प्रश्नाचा ठराव आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की सीमाप्रश्नाचा ठराव होत असताना, इतर कोणताही विषय शक्यतो आपण घेऊ नये. अनेक प्रकरणं आहेत आणि ही प्रकरणं देणारे तुमचेच सहकारी आहेत.”
हे सगळे लोक अलिबाबा ४० चोर –
याचबरोबर, “मी आजच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे, हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणं कदाचित देवेंद्र फडणवीस यांना आता जड होत चाललं असावं, कारण भाजपा यामध्ये महाराष्ट्रात आणि देशात पूर्ण बदनाम होतोय. महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी चालवलेलं हे सरकार आहे आणि हे सगळे लोक अलिबाबा ४० चोर या चाळीस चोरांमधले आहेत. हळूहळू ४० आमदार आणि त्यातले मंत्री या प्रत्येकाचं प्रकरण बाहेर येईल.” असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
याशिवाय, “सामान्यांच्या प्रश्नासाठीच अधिवेशन असतं. याचा अर्थ असा नाही, जर सरकारमधील मंत्री, घटक सामान्यांच्या मालिकीच्या जमिनी अशाप्रकारे लुटमार करून, कोणाच्या घशात घालून आपल्या तुंबड्या भरत असतील तर त्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. ” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
यांचं अस्तित्वच बोगस आहे –
“जयंत पाटलांनी जो शब्द वापरला निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातडीचं सरकार. तुम्ही आमच्यावर भ्रष्टाचाराचे कितीही पुराव्यासह आरोप केले, तरी आम्ही आमच्या खुर्च्यांना चिकटूनच राहू. नैतिकता नाही, प्रमाणिकपणा नाही आणि महाराष्ट्राविषयी प्रेम नाही, असं हे सरकार आहे. जर थोडी जरी नैतिकता असती, तर या अधिवेशनात चार मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले असते. यांचं सगळंच बोगस आहे, यांची डिग्रीच काय, यांचं अस्तित्वच बोगस आहे. सर्वोच्च न्यायालायता यावर निर्णय होईल आणि हे अपात्र ठरतील. हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय.” अशी शब्दांमध्ये संजय राऊतांनी टीका केली.