Sanjay Raut : राज्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. यामध्ये शेतकरी कर्जमाफीबाबतही आश्वासन दिले होते. परंतु, नवं सरकार स्थापन झाल्यानंतरही शेतकरी कर्जमाफीवर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेली असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी कर्जमाफी संदर्भात एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” यावरुन आता त्यांच्यावर टीका केली जाते आहे. संजय राऊत यांनी तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि एकनाथ शिंदेंना खोचक सल्लाही दिला आहे.
अजित पवारांबाबत काय म्हणाले संजय राऊत?
“अर्थमंत्री अजित पवार यांची विधानसभा निवडणुकीची भाषा, तसंच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची भाषा वेगळी होती. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच. ‘च’वर जोर देऊन हे तिन्ही नेते बोलत होते. आता अजित पवारांनी हात वर केले आहेत. अजित पवार कर्जमाफी करु शकत नसतील आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रातल्या वचनभंग केल्याबद्दल नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसंच एकनाथ शिंदेंवरही भाष्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले संजय राऊत?
“एकनाथ शिंदेचं वक्तव्य मी पाहिलं. काहीही झालं तरी वचन पूर्ण करणार म्हणाले. जेव्हा अजित पवार आणि त्यांच्या पक्षाने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ कर्जमाफी देऊ या घोषणा केल्या तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे होते. त्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदेंची जास्त आहे. एकनाथ शिंदे वचन पूर्ण कसं करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाही म्हणत आहेत. एकनाथ शिंदेंनी एक करावं जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाहीत आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपये देत नाहीत तोपर्यंत मी देवगिरी बाहेर उपोषणाला बसेन अशी भूमिका घ्यावी. लाडके भाऊ आहेत ना? मग त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसलं पाहिजे. प्राण जाए पर वचन न जाए हे करुन दाखवलं पाहिजे. मराठा माणसाची, शिवसैनिकाची ही भूमिका असते. एकनाथ शिंदेंच्या डोळ्यांसमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे. शेतकऱ्यांना गंडवलं जातं आहे तुम्ही काय करत आहात? सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा. शिवसैनिक असाल तर शिवसेनेचा खरा आत्मा हा आंदोलन आहे.” असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.
राज ठाकरेंच्या मेळाव्याबाबत काय म्हणाले राऊत?
राज ठाकरेंचा पक्ष भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. हा भाजपच्या मित्रपक्षाचा मेळावा आहे. त्यांची भूमिका भाजपला धरून आहे. त्यांच्या घरी भाजपचे लोक चहापाणाला येतात. उद्याच्या महापालिका निवडणुकीत भाजपसाठी काय भूमिका घेता येईल हे ते मेळाव्यातून मांडतील, अशा शब्दात डिवचतानाच मराठी माणसाला कमजोर करणारी भूमिका राज ठाकरेंनी घेऊ नये, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.