Sanjay Raut on Balasaheb Thackeray : “प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील”, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. मात्र, यावरून संजय राऊतांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाहीत. आम्ही प्रतिकूल परिस्थितीत काय झुंज दिली हे अमित शाहांना माहितच नाही. या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शाहांविरोधातही झुंज देत आहोत. अमित शाहांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी परिस्थिती केलीय, अशा प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही संघर्ष करत उभे आहोत, ही आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे. मतांसाठी त्यांचं नाव घेतलं म्हणजे ती प्रेरणा ठरत नाहीत. बाळासाहेब ठाकरे कृतीशील हिंदूहृदय सम्राट होते. हातात कोणतीही सत्ता नसातना त्यांनी लढा दिला आणि त्याचे परिणाम भोगले. सत्ता नसताना मराठी माणसासाठी लढा दिला. शिवसेनेसारखी कवच कुंडलं तयार केली. ही कवच कुंडलं अमित शाहांनी आणि नरेंद्र मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही.”

हेही वाचा >> “शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका

… तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल

“बाळासाहेबांचा एक विचार होता. बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं. ते ढोंगावर हल्ला करणारे नेते होते. या देशात हिंदूत्वाच्या नावावर ढोंग सुरू आहे, याचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना करतेय. अमित शाह आणि नरेंद्र मोदींना माझं आव्हान आहे, हे ढोंगं बंद करा, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा भारतरत्न सन्मानाने गौरव करा. गेल्या काही काळात मोदी, शाह आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून भारतरत्न दिला जातोय. पण ज्याने या देशात हिंदूत्त्वाचं बिज रोवलं आणि वाढवलं त्या बाळासाहेब ठाकरेंना अजून भारतरत्न का दिला नाही? २०२६ ला बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. तुम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देऊ शकला नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न दिला तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल”, असं संजय राऊत म्हणाले.

बीकेसीच्या मेळाव्यात काय होणार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची बीकेसी येथे भव्य सभा होणार आहे. या सभेत ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, त्यांच्या पक्षात मी, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघेच प्रवेश करायचे बाकी आहोत, त्यांच्या पक्षातील प्रवेशासाठी आम्हीही आता अर्ज केलाय, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut demanding bharatratna award to balasaheb thackeray on his birth anniversery sgk