मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यात एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली होती. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर होती असेही डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांची तब्येत सुधारत आहे. काल रात्री माझी आणि त्यांची फोनवरुन चर्चा झाली. लवकरच ते घरी जातील. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आहेत त्यामुळे त्यांनी संपूर्ण बरे झाल्यानंतर कामाला लागावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करु नये. कारण ज्या प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे कुठेतरी लहान गोष्टीमध्ये कमतरता राहिली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले होते. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून करोनाचा मुकाबला करत आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मानदेखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच. त्यामुळे या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत या दृष्टीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवदेनात म्हटले होते.
“आपण रुग्णालयात दाखल होत असताना, करोना लशींच्या बाबतीत राज्याने १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी सर्वांना लशींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या,” अशी विनंतीही ठाकरे यांनी केली होती.