Sanjay Raut शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी वक्फ बोर्ड विधेयकावरुन भाजपावर टीका केली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख एसंशि असा केला. तर याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे म्हणजे यूटी अर्थात यूज अँड थ्रो असं म्हटलं. या सगळ्याबाबत आता संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले राऊत?
एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट थांबवला जातो आहे असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, मी गणेश नाईकांनी काय म्हटलं आहे? यावर कसं मत व्यक्त करु? एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची. एकनाथ शिंदे त्या ड्रीम प्रकल्पाला काही मंजुरी मिळाली नाही. त्यांचा पक्ष एसंशि आहे. शिवसेना आजही भक्कमपणे उभी आहे. असं संजय राऊत म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे यूटी म्हणजे यूज अँड थ्रो असं उद्धव ठाकरेंना म्हणाले आहेत असं विचारलं असता राऊत म्हणाले, “युज अँड थ्रो मध्ये बी आहे ना बाळासाहेब ठाकरे आहेत. बाप मधे आहे ना तो कसा विसरता? जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत कुणी काही करु शकत नाही.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“एसंशिची बदनामी वगैरे झाली असं वाटत असेल तर याचा अर्थ ते गद्दार आहेत. तुम्ही मला कुणाबद्दल विचारत आहात? एसंशि ना? त्यांनी काय करायचं ते करुदेत ती गद्दार सेना आहे.” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
यू.टी म्हणजे काय युज अँड थ्रो का? -एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरेंनी २०१९ ला खुर्चीसाठी जी तडजोड केली जी चूक केली जो अपराध केला त्यापेक्षा मोठा अपराध हा बुधवारी केला. दरम्यान उद्धव ठाकरे तुमचा उल्लेख एसंशि करत आहेत. असं विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “एसंशि म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदे. बरं, शॉर्टकट मी असं म्हणू का की त्यांचा शॉर्टकट यु.टी. म्हणजे युज अँड थ्रो. वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. मला गद्दार, गद्दार म्हटलं, खोके खोके म्हटलं. महाराष्ट्रातल्या जनेतेने तुम्हाला खोक्यांमध्ये बंद करुन टाकलं. १०० पैकी २० च आमदार आले. ते पण आमच्या काही लोकांच्या चुका झाल्याने आले. गद्दार कोण आणि खुद्दार कोण? याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिला आहे. उद्धव ठाकरे हिंदू असो की मुस्लिम दोन्ही समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उबाठा करते आहे हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे घर का ना घाटका अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली आहे.” असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं.