एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिवसेना पक्ष संघटना नेमकी कोणाची, हा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. या पक्षफुटीला विकासकामांसाठीचा निधी, हिंदुत्त्व तसेच शिवेसेनेचे खासदार संजय राऊत हेदेखील जबाबदार आहेत, असे बंडखोर गटाकडून म्हटले जात आहे. तर दुसरीकडे मी एक शिवसैनिक असून शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे संजय राऊतांनी सांगितलेले आहे. असे असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राऊतांनी जुना फोटो शेअर करुन त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना खास दोस्त असे संबोधले आहे.
हेही वाचा >>> Uddhav Thackeray Interview: पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री ते मुंबई पालिका निवडणूक, पाहा उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत
संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शैलित शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना राऊतांनी एक जुना फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असल्याचे दिसत आहे. तसेच दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. हाच फोटो पोस्ट करुन राऊतांनी उद्धव ठाकरेंना मित्र म्हटलंय. तसेच त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त केली आहे.
संजय राऊतांच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय आहे?
“ये दोस्ती….हम नही तोडेंगे…आपण आमच्या आयुष्यात खास आहात…वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड आणि निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना !” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्ष संघटनेवर कोणाचे वर्चस्व हा वाद शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरु आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा संदेशामध्ये शिंदे यांनी ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख न म्हणता माजी मुख्यमंत्री असं संबोधलंय. एकनाथ शिंदेंच्या या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.