आम्ही आता पुन्हा पक्षबांधणीची तयारी सुरु केली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी बैठका सुरु आहे. सरकारच्या मनात असलं तर महापालिका निवडणुका घेतील. १४ महापालिकांच्या निवडणुका लवकरच येतील अशी अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी आमच्या बैठका होणार आहेत. विधानसभेच्या निकालावर चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. अशा प्रकारच्या निवडणुका १० वर्षांमध्ये ज्या पद्धतीने लढवल्या जात आहेत त्या ७० वर्षांमध्ये आम्ही कधी पाहिल्या नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
“आम्हाला लाखोंच्या संख्येने मतदान झालं होतं. पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही अशी लोकांची संख्या आहे. त्यामुळे मारकडवाडीसारख्या आणि इतर अनेक ठिकाणी पुन्हा मतदान घ्या अशी मागणी केली. लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. आता आम्ही पुढे जात आहोत. महाविकास आघाडी अद्याप आहे. स्वबळावर लढण्याच्या ज्या चर्चा सुरु आहेत, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळी असतातच. आम्ही भाजपासह होतो तेव्हा या गोष्टी झाल्याच. लोकसभेला संख्या कमी असते, विधानसभेला वाढते, आता पुन्हा या निवडणुकीच्या वेळी कमी होते. त्यामुळे स्वबळाच्या चर्चा होतात. त्यात काही विशेष नाही. निवडणुकीत जेव्हा दोन किंवा तीन पक्षांची आघाडी असते तेव्हा जागा बदलत असतात. आपल्या देशात ज्यांच्या हाती ईव्हीएम त्यांची लोकशाही असं होत असतं.” असंही संजय राऊत म्हणाले.
विधानसभेला आमची सत्ता येईल हेच वाटत होतं-राऊत
विधानसभेत आमची सत्ता येईल हे आम्हाला वाटत होतंच. पण तसं घडलेलं नाही. आता नवीन सरकार आल्यापासून काय चित्र आहे ते आपण पाहतोच आहोत. बीड आणि परभणीचा दौरा शरद पवार करणार आहेत. आमचेही लोक जाऊन आले. या राज्यात काय चाललं आहे? सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ विस्तार होत नव्हता. विस्तार झाला तर खातेवाटप जाहीर होत नाही. पाशवी बहुमत असताना तुम्हाला खातेवाटप कसं काय करता येत नाही? मग राज्य कसं चालणार? कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. खून, हत्या, बलात्कार होत आहेत. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भाषणं ऐका. १४ कोटी जनतेचे आभार मानत आहेत. मात्र यांना १४ कोटी जनतेने निवडून दिलेलं नाही. एकनाथ शिंदेंनी शांत बसून स्वतःला हे विचारलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई महापालिकेवर सत्ता आणावीच लागेल अन्यथा…
मुंबई महापालिकेवर आम्हाला शिवसेनेची सत्ता आणावीच लागेल अन्यथा मुंबई वेगळी होईल. मराठी माणसांवर कसे हल्ले सुरु झाले आहेत तुम्ही सगळे पाहात आहातच असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबई आम्ही स्वतंत्रपणे लढलो किंवा महापालिका निवडणुकी स्वतंत्रपणे लढलो याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं नाही. मुंबई ओरबाडली जाते आहे ती जर आमच्या हातून गेली तर मुंबई वेगळी केली जाईल. मी हे म्हणत नाही की आम्ही स्वतंत्रपणे लढू ही कार्यकर्त्यांची भावना आहे. आमची चर्चा सुरु आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.