संजय राऊत म्हणजे सिल्वर ओकच्या दारात उभा राहणारा शिपाई आहे अशी टीका नरेश म्हस्केंनी केली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेले होते त्यावर आज संजय राऊत यांनी टीका केली. डुप्लिकेट शिवसेनेने आधी त्यांचे नेते कोण आहेत ते सांगावं? बाळासाहेब ठाकरे की अमित शाह? हे त्यांनी सांगावं असं संजय राऊत म्हणाले होते. तसंच देवेंद्र फडणवीसांसाठी दिल्ली म्हणजे मक्का-मदिना आहे. मात्र एकनाथ शिंदे तिकडे का जातात? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर आता नरेश म्हस्केंनी टीका केली आहे.
काय म्हटलंय नरेश म्हस्केंनी?
“संजय राऊत म्हणजे सिल्वर ओकच्या बाहेरचा शिपाई आहे. कुणाला नावं ठेवताय? महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार होतं, तेव्हा आपल्या माहित आहे ना? सोनिया गांधींनी अट ठेवली होती की जोपर्यंत उद्धव ठाकरे माझ्या दाराशी येत नाहीत तोपर्यंत मी सरकार स्थापनेला संमती देणार नाही. तुम्हाला मदत करणार नाही. त्यावेळी दिल्ली दरबारी म्हणजेच सोनियांच्या दरबारी कोण झुकलं असेल तर ते उद्धव ठाकरे. सोनियांच्या दारी झुकणारे पहिले ठाकरे ते होते. त्यामुळे संजय राऊत यांनी आम्हाला झुकणारे म्हणू नये. प्रणव मुखर्जी हे जेव्हा राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी मातोश्रीवर आले होते तेव्हा सोनिया गांधी नाराज झाल्या होत्या. प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे. हे काय आम्हाला शिकवत आहेत? ” असं नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले म्हस्के?
“ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना आतमध्ये टाकलं, बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं त्यांच्यासोबत हे सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसले. दाऊदचे हस्तक असलेल्या नवाब मलिकांना यांनी मंत्रिमंडळात ठेवलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना-भाजपाची युती निर्माण केली आहे. आमच्या युतीतले भागीदार हे भाजपाचे आहेत. त्यात आम्ही गुन्हा नाही केला. सकाळी उठायचं आणि भू भू करुन भुंकायचं हे योग्य नाही. “
शिल्लक सेनेतले लोक त्यांना सोडून चालले आहेत. त्यांच्यावर एक प्रकारे थुंकत आहेत. संजय राऊत नावाचा वेडा माणूस स्वतःचे कपडे फाडणार आहे आणि रस्त्यावर फिरणार आहे असंही नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे. सोनिया गांधींकडे सत्तेसाठी कोण गेलं होतं? तेव्हा त्यांनी काय लोटांगण घातलं होतं का? संजय राऊत काय बोलतात? राहुल गांधींबरोबर गळ्यात गळे घालून तुम्ही भारत जोडो यात्रेत फिरलात तेव्हा काय पाय धरले होते का? त्याचं उत्तर द्या. असंही नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे.