राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेतल्याच काही गटांमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक नेते, माजी आमदार संजय राऊतांवर टीका करत आहेत. शिवसेनेतल्या बंडाळीला संजय राऊतच जबाबदार असल्याची टीका ते करत आहेत. यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे, त्यांना अजून राजकारण माहीत नाही. त्यांनी वर्तमानपत्र चालवावं, दुसरं काही करू नये, अशा बोचऱ्या शब्दांत संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिरसाट म्हणाले, “संजय राऊतांवर बोलणं मला खरंच योग्य वाटत नाही. त्या माणसानं उद्धवसाहेबांना छोटं केलं आहे. आता शिवसेनाप्रमुखांना देखील छोटं करायचं काम राऊत करत आहेत. शिवसेनाप्रमुख हे केवळ एका कुटुंबाचे नाहीत. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे नेते आहेत. त्यांचा सन्मान कमी करण्याचं काम संजय राऊत करत आहेत.”
हेही वाचा- “…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा
“स्वाभिमान असेल तर स्वत:चा पक्ष काढा, बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरू नका” या संजय राऊतांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना शिरसाट म्हणाले, “संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे. उद्या जर कुणी म्हणालं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचं नाव वापरू नका, तर कसं चालेल? बाळासाहेब ठाकरेदेखील आता त्याच स्तरावर चालले आहेत. याचा अभिमान असला पाहिजे. शिवसेनाप्रमुख ही काय छोटी व्यक्ती आहे का? जगाने देखील त्यांची दखल घेतली. त्या माणसाचं नाव छोटं करण्याचं काम संजय राऊत करत आहेत. त्यांना राजकारण माहीत नाही, म्हणून त्यांनी वर्तमानपत्र चालवावं, दुसरं काही करू नये,” असा खोचक सल्ला शिरसाट यांनी दिला आहे.