शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेतला एक गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भाजपाला जाऊन मिळाला असला तरी भाजपाला शिवसेनेच्या जागी पर्याय हवा आहे. राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना तो पर्याय बनू शकते, असं अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं. तसेच अलिकडच्या काळात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीसही दोनदा राज ठाकरे यांना भेटले. काल फडणवीस पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मुंबईतल्या दादर येथील निवासस्थानी ते गेले होते. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे विविध राजकीय चर्चादेखील सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भेटीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांनी शिवतीर्थावर लॉजिंग बोर्डिंग केलं तरी आम्हाला काही अडचण नाही. फडणवीस तिथे गेले आणि आठ दिवस राहिले तरी हरकत नाही. ते तिथे गेले कारण राज ठाकरे हे उत्तम होस्ट आहेत. ते लोकांचं आगत-स्वागत फार चांगलं करतात, अगदी पहिल्यापासून.
संजय राऊत म्हणाले, फडणवीसांना शिवतीर्थावर जायची इच्छा झाली असेल तर त्यांनी तिथे जावं, इतरही लोकांनी जावं. तिथे आठ दिवस राहावं. शिवतीर्थावर सकाळी वॉकला जावं. तिथे उत्तम पदार्थ मिळतात, चांगले हॉटेल्स आहेत तिथे. मुळात कोण कुणाकडे जातंय याच्यामुळे शिवसेनेचं भविष्य मार्गी लागत नाही. शिवसेना ही शिवसेनेच्या जागेवर आहे.