राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सत्ताधारी शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाकडून अशाच प्रकारच्या केल्या जाणाऱ्या विधानांना आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच करून ठेवली आहे, असा खोचक टोला लगावतानाच राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामध्ये संजय राऊत यांनी विरोधकांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांमुळे राज्यात मनोरंजनासाठी सिनेमा-नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असा खोचक सवाल देखील केला आहे.
देशातले राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच
संजय राऊत या लेखात म्हणतात, “करोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असं वाटतं. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे”.
मोदी है, तो मुमकिन है…
पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यावर देखील यात टोला लगावण्यात आला आहे. “ज्यांनी कोव्हिशिल्डचे डोस घेतले, त्यांनाच आंतरराष्ट्रीय प्रवासाची परवानगी आहे. अनेक विद्यार्थी, उद्योजक मंडळींचे वांदे झाले अनेकांना युरोप-अमेरिकेच्या विमानतळावरूनच त्यांच्या देशात प्रवेश करू दिला नाही. आपल्या पंतप्रधानांनी कोवॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत. तरी ते खास विमानाने अमेरिकेत पोहोचले. नियम फक्त सामान्यांना, मोठ्यांना नाही का असं विचारलं तर भाजपाचे लोक म्हणतील छे छे, मोदी है तो मुमकिन है! मोदींना कोण अडवणार? हेसुद्धा एक मनोरंजन आहे”, असं संजय राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.
उमा भारतींच्या विधानाचा समाचार
नोकरशहा आमच्या चपला उचलतात, या भाजपा नेत्या उमा भारतींच्या विधानाचाही राऊतांनी समाचार घेतला आहे. “नोकरशहा येणाऱ्या सरकारसमोर झुकत असतात हे सत्यच आहे, माझ्या राज्यात लालफितशाही चालणार नाही, असं बाळासाहेब नेहमी म्हणत. पण नोकरशहांनी आपल्या चपला उचलाव्यात, अशी त्यांची भूमिका नव्हती”, असं राऊत म्हणाले आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा!
संजय राऊतांनी आपल्या लेखात भाजपा नेते किरीट सोमय्या यांना खोचक टोले लगावले आहेत. “सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्रा केली आहे. किरीट सोमय्या रोज सकाळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आरोप करतात. त्यांचे हे आरोप बिनबुडाचे ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे”, असं म्हणत राऊतांनी मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, गोपीनाथ मुंडे यांची उदाहरणं दिली. “आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते!” असा टोलाही शेवटी लगावला आहे.