दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या एका सूचक ट्वीटची जोरदार चर्चा झाली होती. संजय राऊतांनी आपला फोटो ट्वीट करून “कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता है”, असं म्हटलं होतं. यावरून जोरदार तर्क-वितर्क झाल्यानंतर आता संजय राऊतांनी त्या ट्वीटविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने संजय राऊतांनी सगळ्यांना शुभेच्छा देतानाचा विरोधकांवर देखील खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला. यावेळी आपल्या त्या ट्वीटसंदर्भात देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
पाडवा भेट!
राज्यातील करोनाचे निर्बंध हटवणं, ही सरकारची मुख्यमंत्र्यांची जनतेला पाडवा भेट असल्याचं राऊत म्हणाले. “सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला ही भेट दिली आहे. शिवसेनेची गुढी महाराष्ट्रावर सदैव फडकतच राहील. महाराष्ट्राच्या बाहेरही फडकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपली गुढी इतरांपेक्षा उंच कशी राहील, यासाठी प्रयत्न करेन”, असं राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊतांचं ध्येय!
दरम्यान, संजय राऊतांनी एबीपीशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपल्या ध्येयाविषयी भाष्य केलं आहे. “मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे”, असं ते म्हणाले.
‘त्या’ ट्वीटवर राऊतांचं स्पष्टीकरण..
दरम्यान, मौनाबाबत केलेल्या ट्वीटवर राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी त्या दिवसापुरतं बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण मी जर बोललो नाही, तर अनेक विरोधकांची राजकीय दुकानं बंद होतील”, असा टोला राऊतांनी लगावला. “विरोधक हे आमचे व्यक्तिगत शत्रू नाहीत, वैचारिक शत्रू असू शकतात. त्यांच्याशी आम्ही त्या पद्धतीने लढू. सुडानं किंवा बदल्याच्या भावनेनं लढण्याचा प्रश्नच येत नाही”, असं ते म्हणाले.
“आमचं आख्खं गुळाचं पोतं भाजपामध्ये”
भाजपामधील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचं सांगताना संजय राऊतांनी कोपरखळी मारली. “भाजपामध्ये खूप साखरेच्या गाठी आहेत. आमचं आख्खं गुळाचं पोतच आहे तिथे. तिथले सगळेच, मोदी, शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आमच्या जवळचे आहेत. भांडण विचारांचं असलं पाहिजे. व्यक्तिगत शत्रुत्वाने तुम्ही राजकीय भांडणं करायला लागलात, तर महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला धक्का बसेल. इथे कधीही व्यक्तिगत सुडाच्या भावनेनं राजकारण केल्याचं मला आठवत नाही. आमच्यावर ते संस्कार आहेत”, असं राऊत यावेळी म्हणाले.