विरोधकांवर तपास यंत्रणांचा दबाव टाकून त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारवर वारंवार टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरही भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव येत असल्याचं बोललं जात आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी तर त्यासाठी १० जूनचा मुहूर्तही जाहीर करून टाकला आहे! या पार्श्वभूमीवर संजय राऊतांना या चर्चांबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना राऊतांनी राहुल नार्वेकरांनाही लक्ष्य केलं आहे.

“…हा तर राहुल नार्वेकरांचा छंद!”

आमदार अपात्रतेसंदर्भात मुलाखतींमधून भूमिका मांडणाऱ्या राहुल नार्वेकरांना संजय राऊतांनी लक्ष्य केलं आहे. “पक्षांतर हा राहुल नार्वेकरांचा छंद आणि व्यवसाय आहे. महाराष्ट्रात असा एकही पक्ष उरलेला नाही, ज्या पक्षात ते गेलेले नाहीत. त्यामुळे पक्षांतराविषयी त्यांना चीड असण्याचं कारण नाही. त्यांनी गेल्या काही दिवसांत दिलेल्या मुलाखती भगतसिंह कोश्यारींना शोभत होत्या”, असं राऊत म्हणाले.

“घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं नियमबाह्य वर्तन करू नये हे संकेत आहेत. इथे कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्माण झालं. तुम्ही त्याच संविधानाचा कायद्याचं राज्य मोडण्यासाठी गैरवापर करत आहात. तुम्ही देत असलेल्या मुलाखती कायद्याच्या राज्यात बसत नाहीत. न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या खटल्याबाबत कोणताही न्यायमूर्ती समोर येऊन मुलाखती देत नाही की मी अमुक करणार वगैरे. हे पहिले असे गृहस्थ आहेत. यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे”, असं राऊत म्हणाले.

“त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनावर दबाव आणून…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; भाजपावर टीकास्र!

भाजप प्रवेशासाठी दबाव?

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी भाजपा प्रवेशासाठी दबाव येत असल्याबाबत विचारणा केली असता संजय राऊतांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मान कापली जाईल पण शिवसेना सोडणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

नड्डांचं स्वागत!

दरम्यान, यावेळी महाराष्ट्र दौऱ्यावर येणारे भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही राऊतांनी टोला लगावला. “येऊ द्या त्यांना. ते जिथे जातात तिथे त्यांचा पराभव होतो. कर्नाटकात ते ठाण मांडून बसले, तिथे त्यांचा पराभव झाला. आता ते महाराष्ट्रात येतायत, आम्ही त्यांचं स्वागत करतो”, असं राऊत म्हणाले.