CM Devendra Fadnavis in Varsha Bungalow: राज्याचे विद्यमान मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी झाला. पण त्यानंतर जवळपास तीन महिने होऊनदेखील अद्याप मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेले नसल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. देवेंद्र फडणवीसांना यासंदर्भात आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारला आहे. “मारुती कांबळेचं काय झालं? या प्रश्नासारखा देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत? हा आमचा प्रश्न आहे”, असं संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेचा उल्लेख ‘लग्नाचा हॉल’

संजय राऊतांनी आज भाजपावर टीका करताना देशाच्या संसदेचा ‘लग्नाचा हॉल’ असा उल्लेख केल्यामुळे त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. “पंतप्रधानांनी, गृहमंत्र्यांनी अधिवेशन काळात संसदेत यायचं असतं. विरोधी पक्षांचं म्हणणं ऐकायचं असतं. पण गेल्या १० वर्षांत ही पद्धत मोडीत काढली गेली आहे. पंडित नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंत हे सगळे लोक संसदेत पूर्णवेळ बसत होते. आता दुर्दैवाने त्यांनी संसदेची इमारतही बदलली आहे. ते एखाद्या लग्नाच्या हॉलसारखंच आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांना संजय राऊतांचा सवाल

दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी राजीनाम्यानंतर वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे लिंबू सापडले असं विधान केल्यानंतर आता त्यावर संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “किती वेळा त्यावर बोलायचं? देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? हा ‘मारूती कांबळेचं काय झालं’, यासारखा आमचा प्रश्न आहे. इतके दिवस झाले त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन. पण मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षावर अद्याप आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहायला का जात नाहीत?” असा सवाल संजय राऊतांनी केला.

“ते म्हणाले, राहायला गेलो तरी झोपायला जाणार नाही”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर झोपायला जाणार नाही असं म्हटल्याचा दावा राऊतांनी केला. “मी असं ऐकलंय की फडणवीस म्हणाले राहायला गेलो तरी मी वर्षावर झोपायला जाणार नाही. हा काय प्रकार आहे? आख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागली आहे. शिंदे गटातल्या या लिंबू सम्राटांनी त्याचं उत्तर द्यावं. भाजपाच्या अंत:स्थ गोटात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये खोदकाम करून कामाख्य देवी मंदिरात कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगं पुरली आहेत जेणेकरून दुसऱ्या कुणाकडे मुख्यमंत्रीपद टिकू नये. अशी चर्चा आहे. त्यांचेच लोक सांगत आहेत. तिथला कर्मचारीवर्ग सांगतोय. हे खरं आहे की खोटं आहे माहिती नाही”, असा दावा राऊतांनी केला.

“राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. त्यांच्या प्रतिष्ठेचा तो मुद्दा आहे. नक्की तिथे काय घडलंय? कुणामुळे झालंय? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्वस्थ आहे? हे महाराष्ट्राला समजायला हवं”, असंही संजय राऊत म्हणाले.