गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून टीका करताना खालची पातळी गाठली जात असल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदेंना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीवरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
एकनाथ शिंदेंना मानद डी. लिट पदवी!
एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आलं आहे. मंगळवारी पार पडलेल्या या समारंभात एकनाथ शिंदेंनी त्यावरून राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. “कुलपती विजय पाटील म्हणाले, तुम्ही आता डॉ. एकनाथ शिंदे होणार. पण, यापूर्वीच मी डॉक्टर झालोय. छोटीमोठी ऑपरेशन करत असतो. समाजात इतके वर्ष काम करतोय. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या याच विधानावरून संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. “डॉक्टरांना विचारा की वीर सावरकर हे कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले”, असं राऊत म्हणाले. “ऑपरेशनचं आम्हाला सांगू नका. आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा. डॉक्टर महाराष्ट्रात पायलीला ५० मिळत असतात”, असंही राऊत म्हणाले.
“मी आधीच डॉक्टर झालोय, छोटीमोठी ऑपरेशन…”, डी. लीट पदवी मिळाल्यावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
“एकनाथ शिंदेंनी एक शस्त्रक्रिया स्वत:वर करावी”
“प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळत असते हा अनुभव आहे. अशी डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी झाली पाहिजे. भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्यांना डॉक्टरेट कशी देता? एकनाथ शिंदे डॉक्टर झाले असतील तर आनंदच आहे. पण त्यांनी स्वत:वरच शस्त्रक्रिया करायला हवी”, असा टोलाही राऊतांनी लगावला.
‘त्या’ ट्वीटवर चर्चा!
दरम्यान, संजय राऊतांनी आज सकाळी केलेल्या एका ट्वीटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. “केवढी अजब बाब आहे. गुलामीची जेव्हा सवय होते, तेव्हा प्रत्येकजण आपली खरी ताकद विसरतो”, असं लिहिलेला एक फोटो या ट्वीटमध्ये राऊतांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक घोडा एका प्लॅस्टिकच्या खुर्चीला बांधून ठेवल्याचं दिसत आहे. वर “भारत माता की जय”, असं राऊतांनी लिहिलं आहे.