पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा आटोपला असून आता त्यावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यात अनेक मान्यवरांना भेटले. यावेळी त्यांनी भारत आणि अमेरिका द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत होण्यासाठी चर्चा केल्याचा तपशील समोर आला आहे. मात्र, यासंदर्भात आता विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक प्रश्न केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सुंदर पिचईंनी केलेल्या कराराचा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.
सुंदर पिचईंची गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक
संजय राऊतांनी ट्वीटसोबत शेअर केलेला स्क्रीनशॉट गुगलवरच्या एका माहितीचा आहे. यात नमूद केल्यानुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर एका कराराची घोषणा केली. यानुसार, गुजरातमध्ये लवकरच गुगलचं ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर स्थापन केलं जाणार असून त्यासाठी तब्बल १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार असल्याचं पिचईंनी जाहीर केलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातून परराज्यात गेलेले अनेक मोठे प्रकल्प आणि त्याबरोबर त्या प्रकल्पामुळे निर्माण होऊ शकणारे लाखोंचे रोजगार परराज्यात गेल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन मित्रपक्षांनीही सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. त्यापाठोपाठ आता सुंदर पिचईंच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा गुजरातला झुकतं माप दिल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली आहे. त्याचसंदर्भात संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमधून देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल केला आहे.
ट्वीटमध्ये काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी ट्वीटमध्ये मुंबई किंवा महाराष्ट्राला या दौऱ्यातून काहीच न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. “देवेंद्रजी, हे खरं आहे? मोदीजी अमेरिकेला गेले. तिथे एकमेव गुंतवणूक करार केला, तो फक्त आपल्या गुजरातसाठी. महाराष्ट्राला काय मिळालं? घंटा! मुंबई देशाची आर्थिक राजधानी खरंच आहे ना? दया, कुछ तो गडबड है”, असं संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या या ट्वीटनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.